विद्यार्थी व पालकांना नुकसानभरपाई द्यावी; एनटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा प्रतिनिधी शुभम कोदे
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत सदोष मनुष्यवधासह विविध कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून विद्यार्थी व पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.याबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री, सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल तसेच राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) यांच्यासह संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
तिकुंडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, नीट परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसले होते. एवढ्या मोठ्या सुरक्षा व्यवस्थेनंतरही पेपरफुटी झाल्याने परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडला आहे. काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे.
परीक्षा आयोजन, सुरक्षा व्यवस्था, चौकशी, पुनर्परीक्षा आणि प्रशासकीय प्रक्रियांवर सार्वजनिक निधीचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून, यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व संबंधित यंत्रणांची फौजदारी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच पेपरफुटी, निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, संगनमत, पदाचा गैरवापर आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेस कारणीभूत ठरलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) अधिनियम, २०२४ अंतर्गत गुन्हे नोंदवावेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये, तर परीक्षा प्रक्रियेमुळे मानसिक व आर्थिक फटका बसलेल्या प्रत्येक विद्यार्थी-पालकाला एक लाख रुपयांची नुकसानभरपाई राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून देण्यात यावी. ही रक्कम दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करून त्यांची चल-अचल मालमत्ता जप्त करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षण, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित परीक्षा सुरक्षा व्यवस्था आणि जबाबदारी निश्चित करणारी पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही महारुद्र तिकुंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा









