६८ पर्यवेक्षक आणि ३४ झोनल ऑफिसर्स नियुक्त; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा,सिंदखेडराजा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेला जोरदार प्रारंभ झाला आहे. ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असून, मतदार याद्या अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली आहे.
मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवमतदारांची नोंदणी करणे तसेच मयत व दुबार नावे वगळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभागाने कंबर कसली असून संपूर्ण मतदारसंघात नियोजनबद्ध यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण
या विशेष मोहिमेसाठी प्रशासनातर्फे ३४० बीएलओ, ६८ पर्यवेक्षक आणि ३४ झोनल ऑफिसर्स नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण 'जिजाऊसृष्टी' येथे, तर देऊळगाव राजा व चिखली तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देऊळगाव राजा येथे पार पडले. प्रशिक्षणासोबतच सर्व कर्मचाऱ्यांना मोहिमेसाठी आवश्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले आहे.
घरोघरी जाऊन होणार पडताळणी
उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यांनी प्रशिक्षण सत्रादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करत त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. मोहिमेदरम्यान नियुक्त केलेले बीएलओ (BLO) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेणार आहेत. नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती अथवा नाव वगळण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म बीएलओमार्फत नागरिकांना जागेवरच उपलब्ध करून दिले जातील.
प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी आपापल्या भागातील बीएलओ यांच्याकडे अचूक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून जमा करावेत. मतदार यादी स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्याच्या या राष्ट्रीय कार्यात सर्व नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



