दुचाकी दुभाजकावर आदळून चालकाचा जागीच मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील भुईंजजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद बबनराव धुमाळ (वय ४२, रा. सोनके, ता. कोरेगाव) हे त्यांच्या दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात होते. भुईंजजवळ कृष्णा नदीवरील उड्डाणपुलावर आल्यानंतर दुचाकीवरील ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळले. अपघात इतका भीषण होता की प्रमोद धुमाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अद्यापही दुरुस्ती व देखभालीची कामे प्रलंबित आहेत. रस्त्यावर साचणारे पाणी, खड्डे व डबकी यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत असून वारंवार अपघात घडत आहेत. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून महामार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



