अतिवृष्टीच्या संकटावर प्रशासनाची रात्रभर झुंज

जांभळी, पारटवाडी परिसरात मदतकार्याला वेग

Heavy rain rescue operation speed up, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाई तालुक्यातील जांभळी–पारटवाडी परिसरात भूस्खलन होऊन मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत सात पाळीव जनावरे दगावली, सुमारे २५ एकर भातशेती वाहून गेली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच जांभळी–पारटवाडी मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सन २०२२ मधील भूस्खलनाचा अनुभव लक्षात घेऊन यंत्रणांनी विलंब न करता युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.

तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या अधिकारी आवळे रावसाहेब व महसूल विभागाचे मंडल अधिकारी श्रीकांत धानावडे यांनी रात्रभर अथक परिश्रम घेतले. पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने ओढ्यात साचलेला राडारोडा, गाळ, माती व झाडे हटवून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे पुढील संभाव्य नुकसान टाळण्यात प्रशासनाला मोठे यश मिळाले.

सहा तारखेच्या रात्री उशिरापर्यंत आणि त्यानंतरही दिवसभर अखंडपणे सुरू असलेल्या या कामामुळे संकटाची तीव्रता कमी करण्यात महत्त्वाची मदत झाली. पुलाचा भराव पूर्णपणे वाहून गेल्याने दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महसूल विभागाचे मंडलाधिकारी श्रीकांत धनवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवळे रावसाहेब यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल हवामानातही घटनास्थळी रात्रभर थांबून मदतकार्याची धुरा सांभाळली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मोठी मदत झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या या कार्याचे कौतुक करत सहकार्य केले.

दरम्यान, जनावरे व भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच परिसरात झालेल्या भूस्खलनाच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नदी-नाले, ओढे व पूल ओलांडताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. संकटाच्या या कठीण काळात प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दाखविलेली तत्परता व समन्वयामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !