जनहिताय फाऊंडेशनतर्फे जंगी स्वागत!
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
कराड शहर वाहतूक विभागाचे नवनियुक्त सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. याबद्दल जनहिताय फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. साळुंखे यांच्या आगामी कार्यकाळात कराडची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
समाजहिताच्या विविध उपक्रमांत नेहमीच आघाडीवर असणाऱ्या जनहिताय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी संदीप साळुंखे यांचे अभिनंदन केले. "नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातील वाहतूक शिस्त, रस्ते सुरक्षा, अपघात प्रतिबंध आणि जनजागृतीच्या कामाला मोठी गती मिळेल. पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल," असा विश्वास लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी जनहिताय फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती, रस्ता सुरक्षा अभियान आणि नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली. समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज असल्याचे मतही यावेळी मान्यवरांनी मांडले.
या कौतुक सोहळ्याला जनहिताय फाऊंडेशनचे सदस्य राजेंद्र ताटे यांच्यासह कराड वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या लोकाभिमुख, कर्तव्यदक्ष आणि प्रभावी कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केवळ पोलीस कारवाईवर अवलंबून न राहता नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन यातून कराडची वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व आदर्श बनवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



