शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाढदिवस हा केवळ केक कापण्याचा किंवा सत्कार स्वीकारण्याचा दिवस नसून, समाजाला काहीतरी परत देण्याची उत्तम संधी असते, हा संदेश देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाई शहरात एका प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला वाईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी सुरू असलेली विकासकामे आणि लोकाभिमुख योजना अधिक व्यापक व्हाव्यात, असे साकडे घालण्यात आले. तसेच राज्याच्या समृद्धीसाठी आणि मुख्यमंत्र्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी उपस्थितांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
या उपक्रमाला माजी आ. मदन भोसले, लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, तसेच नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. यात विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, पंचायत समिती सदस्या सुरभी भोसले आणि जितेंद्र पिसाळ यांचाही सहभाग होता.
या संपूर्ण शिबिराचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते काशिनाथ शेलार यांनी केलेले सलग ६२ वे रक्तदान. त्यांच्या या अफाट समाजसेवेने आणि सातत्याने रक्तदान करण्याच्या उच्चाराने उपस्थितांच्या अंगावर काटा आणला. त्यांच्या या योगदानाने उपस्थितांना मोठी प्रेरणा मिळाली असून, "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा विचार यानिमित्ताने अधिक दृढ झाला.
रक्तदान संकलनाची जबाबदारी वाईतील अग्रगण्य आणि वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या बेल एअर संस्थेने अतिशय समर्थपणे पार पाडली. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाने वाई शहरात सर्वत्र कौतुक होत असून, एका राजकीय नेत्याचा वाढदिवस खऱ्या अर्थाने समाजोपयोगी कसा ठरतो, याचे उत्तम उदाहरण वाईकरांनी घालून दिले आहे.
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






