एक दिवस बळीराजासाठी - जिल्हाधिकाऱ्यांनी शेतात रोटर चालवून केली चिखलणी; मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून घेतला भात लावणीचा आनंद; चारसूत्री लागवडीचे प्रात्यक्षिक

'A Day for the Farmer' Initiative, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे (ता. जावली, जि. सातारा) येथे कृषी व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भात लावणी व शेतकरी संवादाचा कार्यक्रम गुरुवारी (२३ जुलै) पार पडला. या कार्यक्रमात बाहुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतावर सुधारित चारसूत्री भात लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चिखलणीचा अनुभव

या उपक्रमादरम्यान सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी करत भाताची लावणी केली. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः रोटर चालवून चिखलणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे 'बळीराजाशी नाळ जोडणारा' या उपक्रमाचा मूळ उद्देश खऱ्या अर्थाने सार्थ ठरला.

शेतकऱ्यांशी थेट संवाद व मार्गदर्शन

भात लावणीनंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चारसूत्री भात लागवडीचे फायदे आणि शासनाच्या विविध कृषी योजनांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

 प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती

या कार्यक्रमास जावलीचे तहसीलदार प्रवीण मुदगल, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड, मंडल कृषी अधिकारी (मेढा) बापूसाहेब रुपनवर, उपकृषी अधिकारी प्रसाद फडतरे व दत्तात्रय जाधव उपस्थित होते.

तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सर्वश्री वैभव डोईफोडे, मिलिंद बर्गे, भानुदास चोरगे, संतोष इंगवले, विलास कदम, सचिन बेसके, विशाल डंगारे, धनंजय सापते, नितीन जांभळे, अनिल चव्हाण, रामकृष्ण डंगारे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकरी-प्रशासन नाते अधिक दृढ

शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात लावणीचा आणि 'एक दिवस बळीराजासाठी' या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाल्याची भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !