पाऊस, वारा आणि ऊन यांची तमा न बाळगता कर्मचाऱ्यांनी पार पाडले कर्तव्य
शिवशाही वृत्तसेवा, नातेपुते प्रतिनिधी - वैभव कुलकर्णी
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त महावितरणच्या नातेपुते येथील टीमने मागील अनेक दिवसांपासून अविरत, अहोरात्र मेहनत घेत पालखी सोहळा यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. पाऊस, वारा आणि ऊन यांची तमा न बाळगता या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नातेपुते नगरपंचायत क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची टीम पूर्णपणे सज्ज होती. दरम्यान, काल दुपारी काही तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ग्रामस्थ व नगरपंचायत प्रशासनामध्ये काही काळ नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
अशा आव्हानात्मक परिस्थितीत, पालखी सोहळ्याच्या गर्दीमुळे नेटवर्क जाम होऊन मोबाईल संपर्क साधणे कठीण झाले होते. मात्र, महावितरणच्या टीमने हार न मानता 'वॉकी-टॉकी'च्या माध्यमातून एकमेकांशी अचूक संवाद साधला आणि समन्वयाने काम केले. महावितरणचे रूपनवर सर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून तांत्रिक माहिती दिली आणि वरिष्ठांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार, बंद झालेला वीजपुरवठा युद्धपातळीवर पुन्हा पूर्ववत केला. या तत्परतेमुळे ग्रामस्थांची नाराजी दूर होऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर माऊलींचे आगमन होताच संपूर्ण कालावधीत वीजपुरवठा अखंडित राहिला. आव्हानात्मक परिस्थितीत महावितरणने दाखवलेली ही तांत्रिक सज्जता, जबाबदारीचे भान आणि सेवाभावाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. महावितरणच्या या नियोजित आणि चोख कामगिरीमुळेच पालखी सोहळा विनाविघ्न पार पडण्यास मोठी मदत झाली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






