‘अजितदादांच्या कार्यशैलीतून प्रेरणा घेऊन वाईचा सर्वांगीण विकास करणार’ – नगराध्यक्ष अनिल सावंत
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहराच्या विकासात्मक वाटचालीत मोलाचे योगदान देणारे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. ना. अजित पवार यांच्या प्रतिमेचे वाई नगरपरिषदेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अत्यंत भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या विशेष पुढाकाराने हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी स्व. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना नगराध्यक्ष अनिल सावंत भावुक झाले होते. ते म्हणाले, "राज्याच्या पायाभूत सुविधा, जलसंपदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणात अजितदादांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या याच कार्यशैलीतून प्रेरणा घेऊन वाई शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकाभिमुख सुविधा आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे."
आपले अनुभव सांगताना नगराध्यक्ष पुढे म्हणाले की, "महायुती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा अजितदादा वाईमध्ये येत, तेव्हा ते आवर्जून शहराच्या विविध विकासकामांचा आढावा घेत असत. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करताना मला त्यांच्या कार्यपद्धतीचा अत्यंत जवळून अभ्यास करता आला. वाई शहराच्या हिताचे कोणतेही काम असो, दादा ते तत्काळ मार्गी लावत. त्यांचा तो कामाचा झपाटा आणि ऊर्जादायी सहवास आता पुन्हा मिळणार नाही," अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
यावेळी नगरसेवक प्रसाद बनकर, नीलिमा खरात, भारत खामकर, शैलेंद्र देवकुळे आणि विजय ढेकणे यांनीही स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शहरात या कार्यक्रमाची विशेष चर्चा रंगली होती. स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेचे अनावरण करताना वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक सदस्यांनी यात आघाडी घेणे अपेक्षित होते. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची अनास्था दिसून आल्याने, उपस्थित आणि राजकीय वर्तुळात याबाबत दबक्या आवाजात उलट-सुलट चर्चा सुरू होती.
या ऐतिहासिक आणि भावपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी वाई नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



