वाई नगरपरिषदेची विशेष सभा वादळी - २३ कोटींच्या सांडपाणी प्रकल्पात 'मलई' खाल्ल्याचा नगराध्यक्षांचा थेट आरोप

अधिकारी-ठेकेदारांच्या संगनमताने नियम धाब्यावर बसवल्याचा दावा; प्रशासनाला घेतले फैलावर

Special Meeting of the Municipal Council, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई नगरपरिषदेची विशेष सभा सोमवार, दि. २९ जून रोजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत वादळी ठरली. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या २२ कोटी ८४ लाखांच्या सांडपाणी व्यवस्थापन (STP) प्रकल्पात प्रशासन आणि ठेकेदारांनी संगनमत करून 'मलई' खाल्ली असल्याचा थेट आणि खळबळजनक आरोप नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केला. अधिकारी बेजबाबदारपणे वागत असून नियम धाब्यावर बसवून काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासकीय अधिकारी प्रभुणे यांना चांगलेच फैलावर घेतले. तर दुसरीकडे २४ तास नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मुदतवाढ देतानाच, विविध विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

     शहरातील २२ कोटी ८४ लाखांच्या एसटीपी प्रोजेक्टसाठी तब्बल ८३ लाख रुपये कन्सल्टंट फी असून, त्यापैकी ७० लाख रुपये प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून कन्सल्टंटला दिल्याचा आरोप सभेत झाला. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी विचारणा केली की, "५० लाख लिटर क्षमता असलेल्या कलेक्शन टॅंकसाठी जागा उपलब्ध नसताना काम का थांबले? प्रकल्पाचा 'स्मेल रेडियस' अडीचशे मीटर असून तो लोकवस्तीजवळ असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. मग योजना मंजूर करताना कोणतीही काळजी का घेतली नाही?" पाईपलाईनचे काम आधी करणे गरजेचे असताना ठेकेदार मशीन बसवण्यासाठी का घाई करतोय, असा सवाल करत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा नगराध्यक्षांनी दिला.

     या कामात राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी निधी आणला असून त्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्ष म्हणाले. यावर नगरसेवक शैलेंद्र देवकुळे यांनी आक्षेप घेत, "मंत्र्यांनी निधी आणला, त्याचा योग्य विनियोग करण्याचे काम नगराध्यक्षांचे आहे, तुम्ही स्वतः लक्ष घालत नाही, असे बीन बुडाचे  आरोप करू नका," असे सुनावल्याने सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

नगरसेवक भारत खामकर यांनी सांडपाणी योजनेच्या पाईपलाईनवर गंभीर आक्षेप घेतला. कृष्णा नदीच्या दोन्ही तीरांवर आणून टाकलेल्या सिमेंट पाईपचा व्यास अत्यंत लहान असून शहरातील सांडपाणी त्यात सामावणार नाही व योजना अपयशी ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अधिकार्‍यांनी आपलेच घोडे पुढे न ढकलत, शहरात रिक्षा फिरवून समस्त वाईकरांच्या उपस्थितीत जाहीर मिटिंग घ्यावी आणि पाईपचा व्यास वाढवून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

     नगरसेवक प्रसाद बनकर यांनी कन्सल्टंटवर गंभीर आरोप केले. सर्वे करताना शहरातील 'नावेची वाडी' हा भाग खड्ड्यात असल्याचे दाखवून तो मागे ठेवण्यात आला. कन्सल्टंटला दिलेले ७० लाख रुपये वसूल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच कॉन्ट्रॅक्टरने नदी घाटाचे नुकसान केले असून काळेश्वरी मंदिर, मारुती मंदिराच्या पायऱ्या आणि तेथील पार तोडल्याचा आरोप करत दोघांवरही कारवाई करण्याची मागणी बनकर यांनी केली.

     महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना ६० ते ६५% पूर्ण झाली आहे. मात्र, सिद्धनाथवाडी येथील पाण्याच्या टाकीसाठी जागेची खरेदी प्रक्रिया अपूर्ण असल्याने ठेकेदाराला ७ ते ८ महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली. यावेळी नगरसेविका जागृती पोरे यांनी "खड्डे काढल्यानंतर नळ कनेक्शन तुटतात आणि ४-४ दिवस जोडले जात नाहीत," असा जाब ठेकेदाराला विचारला. त्यावर ठेकेदाराने तातडीने कनेक्शन जोडून देण्याचे आश्वासन दिले.

     थोडक्यात काय तर, वाई शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ही विशेष सभा अत्यंत वादळी, आरोपांनी वेढलेली आणि महत्त्वपूर्ण ठरली.

सभेतील इतर महत्त्वाचे निर्णय व घडामोडी

मोफत स्ट्रीट लाईट पोल: मे. SDJ ADS and Company (मुंबई) यांच्या माध्यमातून 'CSR' अंतर्गत बावधान नाका ते हॉटेल चतुर्थी दरम्यानच्या दुभाजकावर मोफत आकर्षक स्ट्रीट लाईट पोल बसवले जाणार असून, देखभालीचा खर्च कंपनीच करणार आहे.

शाळा व मैदानासाठी जमीन संपादन: मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्र. ७ (प्रायमरी स्कूल व प्ले-ग्राउंड) च्या जमीन संपादनासाठी १ कोटी ३३ लाख २५ हजार रुपये भरण्याचे आदेश आहेत. नगरपरिषदेकडे निधी नसल्याने जिल्हास्तरावरून निधी मिळवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

कचरा प्रकल्पावरून नाराजी: घनकचरा व्यवस्थापनाचा निधी १ वर्षापूर्वी मंजूर होऊनही टेंडर काढले जात नसल्याने नगराध्यक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला. सध्या कचऱ्यावर प्रक्रिया बंद असून केवळ संकलन सुरू असल्याचे समोर आले.

भत्ता शाळेला वर्ग: नगरसेवक शैलेंद्र देवकुळे यांनी आपल्या मासिक मिटिंगचा मिळणारा भत्ता शाळा क्रमांक ५ ला वर्ग करण्याची विनंती पत्राद्वारे नगराध्यक्षांकडे केली.

     -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !