प्रवासात हरवलेली बॅग काही वेळातच शोधून परत केली!
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
खाकी वर्दीतील माणुसकी आणि कर्तव्याची तत्परता पुन्हा एकदा भुईंज पोलिसांनी दाखवून दिली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका तरुणाची मौल्यवान ऐवज आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग रस्त्यात पडली होती. भुईंज पोलिसांनी अत्यंत तत्परतेने शोध घेऊन ही बॅग अवघ्या काही वेळातच संबंधित तरुणाला सुखरूप परत केली.
कागल (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेले प्रथमेश संजयकुमार घोरपडे (वय २७ वर्षे) हे सोमवार दि. २९ जून २०२६ रोजी सकाळी १० च्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान आनेवाडी टोलनाक्याजवळ त्यांची पाठीवरची बॅग अचानक रस्त्यात पडली.
या बॅगमध्ये एक मौल्यवान HP कंपनीचा लॅपटॉप, पॉकेट, सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स, लायसन्स, गाडीचे आर. सी. बुक आणि बँकेचे ATM कार्ड यांसारखी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य होते.
बॅग गहाळ झाल्याचे समजताच भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांनी कमालीची तत्परता दाखवली. त्यांनी तात्काळ शोधमोहीम राबवून ती बॅग आणि त्यातील सर्व साहित्य सुरक्षितपणे शोधून काढले. आपली अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आणि लॅपटॉप सुखरूप परत मिळाल्यामुळे प्रथमेश घोरपडे यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि भुईंज पोलिसांचे मनापासून आभार मानले.
भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस अमलदार सुशांत धुमाळ यांच्यासह चव्हाण, पवार, निंबाळकर, कुंभार, भोसले, कदम आणि पोळ-कदम आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
ऐन प्रवासात हतबल झालेल्या नागरिकाला तात्काळ मदत करून पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे परिसरात आणि सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



