जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; परवानगी नसताना बेकायदेशीर आंदोलन करून भाविक आणि प्रशासनाला वेठीस धरल्याचा आरोप
एकीकडे विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आणि दुसरीकडे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे कडक जमावबंदी आदेश लागू असताना, आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात बेकायदेशीर आंदोलन करत प्रशासकीय नियमांचा पुरता फज्जा उडवला आहे. अधिक मासानिमित्त विठ्ठलनगरीत भाविकांची अलोट गर्दी झालेली असताना, कोणतीही परवानगी न घेता केवळ राजकीय स्टंटबाजीसाठी मुख्य चौकात आंदोलन करून हजारो भाविक आणि स्थानिक नागरिकांना वेठीस धरल्याचा घणाघात भाजप किसान मोर्चाने केला आहे. याप्रकरणी आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, या मागणीचे जाहीर निवेदन आज पंढरपूरचे प्रांत अधिकारी आणि शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले.
नियम फक्त सामान्य जनतेसाठी का? लोकप्रतिनिधींना मोकळे रान?
सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता आणि जमावबंदी लागू आहे. असे असताना पंढरपूर नगरपालिकेकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून आंदोलनाला कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती. तरीही केवळ राजकीय प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता अडवण्यात आला. यामुळे विठ्ठल दर्शनासाठी मैलोन्मैल चालत आलेल्या वारकऱ्यांचे, भाविकांचे आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे अतोनात हाल झाले. "नियम काय फक्त सामान्य जनतेनेच पाळायचे का? कायद्याचे रक्षकच जर कायदा पायाखाली तुडवणार असतील, तर प्रशासनाचा वचक राहिला कुठे?" असा संतप्त सवाल या निमित्ताने 'गावकुस'च्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
भाजप किसान मोर्चा मैदानात; पोलीस ठाण्यात धडक
आमदार रोहित पवारांच्या या बेकायदेशीर आंदोलनाविरोधात भाजप किसान मोर्चाने आक्रमक पाऊल उचलले आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य तथा किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस श्री. माऊली (भाऊ) हळणवर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि प्रांत अधिकारी यांना थेट निवेदन सुपूर्द केले.
यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की, "अधिक मासाच्या पवित्र काळात पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. अशा वेळी शहराच्या मुख्य चौकात विनापरवानगी आंदोलन करणे म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रशासनावर विनाकारण ताण आला आणि लाखो भाविकांची हेळसांड झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या अशा आंदोलकांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे."
हे पदाधिकारी होते उपस्थित
निवेदन देताना भाजप किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांच्यासह संजय लवटे सर, विजय आण्णा मेटकरी, पैलवान नामदेव घोडके, पैलवान अण्णा घोडके, अजय देशमुख, गोपी पांढरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता या बेकायदेशीर आंदोलनावर पंढरपूर पोलीस आणि जिल्हा प्रशासन काय कारवाई करते, की राजकीय दबावापोटी याकडे कानाडोळा केला जातो, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



