कोल्ही शाळेत शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तक वाटपाचा उत्साह; विद्यार्थ्यांसाठी आर.ओ. पाणी फिल्टरची मागणी
शिवशाही वृत्तसेवा ,वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
कोल्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाण्याची हाक; अरविंद पवार यांचा पुढाकार"
कोल्ही येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक असलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप उत्साहात पार पडले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याबरोबरच नवीन शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱ्या पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले. तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. शाळेतील वर्गनिहाय पटसंख्या, शिक्षकांची मंजूर व कार्यरत पदे, रिक्त पदांची स्थिती, शाळेच्या इमारतींची अवस्था, उपलब्ध भौतिक सुविधा तसेच भविष्यात आवश्यक असलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य शाबुद्दीन शेख, कोल्ही शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक राजेंद्र जानराव सर, शाळेतील शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार लाभावेत, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत अरविंद तुकाराम पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वर्षभर स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शाळेत आर.ओ. पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात, शाळेतील अनेक विद्यार्थी दिवसभर शाळेत उपस्थित राहत असल्याने त्यांना सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून या मागणीला प्राधान्य देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी संजय पाटील निकम यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य दिले जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने येणाऱ्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तक वाटपाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आर.ओ. पाणी फिल्टरची मागणी पुढे आल्याने हा कार्यक्रम केवळ साहित्य वितरणापुरता मर्यादित न राहता शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थित पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



