३६५ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने परिसर गजबजला - प्री-प्रायमरीच्या बालचमूंना औक्षण करत खाऊचे वाटप
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित, पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३६५ विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभल्याने संपूर्ण शाळा परिसर गजबजून गेला होता. नवीन वर्षाच्या आनंदात आणि काहीशा भावूक वातावरणात हा स्वागत समारंभ संपन्न झाला.
दीर्घ सुट्टीनंतर शाळेत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सुधीर पटवर्धन, संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर, संस्थेचे सदस्य डॉ. मिलिंद जोशी, एस. पी. कुलकर्णी आणि संजू कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या पहिल्या दिवशी संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. काही बालचमूंनी आई-वडिलांच्या आठवणीत रडून आपला पहिला दिवस साजरा केला, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यासाठी थेट 'डोरेमोन' अवतरला होता. डोरेमोनच्या वेशभूषेत असलेल्या एका विद्यार्थ्याने या लहानग्यांचे कौतुक करत त्यांचे स्वागत केले, ज्यामुळे रडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरही हसू उमलले. सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन वर्गात जाण्याचा एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या प्री-प्रायमरी सेक्शनच्या (पूर्व प्राथमिक) सर्व लहान मुलांचे विशेष कौतुक करण्यात आले. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. त्यानंतर त्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या अनोख्या स्वागतामुळे मुलांचा शाळेतील पहिला दिवस अतिशय आनंददायी ठरला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा अत्यंत पद्धतशीरपणे पार पडला. हा पहिला दिवस यशस्वी आणि उत्साही करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने शिक्षक वृंद काळे, जगताप, जाधव, पोरे, शिंदे, दुरुगकर, चोबे, हुच्चे तसेच क्षितिज मोहोळकर आणि पृथ्वीराज पाटील आदींनी मोलाचे योगदान दिले. या सोहळ्याला पालक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



