प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संताप, जमीन परत देण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पश्चिम भागातील मौजे धोम, ता. वाई, जि. सातारा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, मूळ उद्देशाला हरताळ फासून संपूर्ण प्रकल्प खासगी ठेकेदाराच्या ताब्यात देण्यात आल्याचा आरोप केला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सन १९७२ मध्ये शासनाने मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करण्याच्या उद्देशाने त्यांची सुपीक जमीन संपादित केली होती. त्या वेळी प्रकल्पाचा मुख्य हेतू सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायिक व शेतकऱ्यांना नाममात्र दरात मत्स्यबीज उपलब्ध करून देणे हा होता. मात्र सध्या हा उद्देश पूर्णपणे बाजूला पडला असून मत्स्यबीज उपलब्ध होत नसल्याची तसेच उपलब्ध झाले तरी त्याचे दर सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
"शासनाने मत्स्यबीज उत्पादन केंद्र खासगी ठेकेदाराच्या ताब्यात देऊन मत्स्य व्यवसायिकांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे का?" असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शासनाने जर मूळ उद्देशच बदलला असेल, तर संपादित केलेल्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत द्याव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जमीन संपादित करताना पर्यायी जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र आजतागायत अनेक प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन मिळालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, मत्स्यबीज आयुक्तांना निवेदन देण्यासाठी शेतकरी प्रतिनिधी गेले असता, प्रकल्पाचा खासगी ठेकेदार असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीने आयुक्तांसमोरच शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. "तुम्ही पहिल्यांदा गेटच्या बाहेर जाऊन बोला, जो काही आहेर करायचा तो बाहेर जाऊन करा, इथला मालक मी आहे," अशा शब्दांत शेतकरी प्रतिनिधींना सुनावण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या मालकीच्या प्रकल्पात एका खासगी ठेकेदाराची अशी मालकाची भाषा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी झालेली कथित अरेरावी यामुळे धोम व परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून खासगीकरणाचा निर्णय, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांबाबत शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी धोम येथील शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना धोम गावचे सरपंच सचिन कांबळे माजी सरपंच अविनाश नायकवडी अशोक मराठे प्रकाश पोळ प्रमोद पोळ प्रशांत पोळ देविदास पोळ दिलीप शेरे बायजाबाई वाघमारे आदी उपस्थित होते.
धोम ग्रामस्थांच्या मुख्य मागण्या : धोम मत्स्यबीज प्रकल्पाच्या खासगीकरणाची चौकशी करावी. मूळ उद्देशापासून भरकटलेल्या प्रकल्पाबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी. प्रकल्पग्रस्तांना प्रलंबित पर्यायी जमीन तात्काळ द्यावी. प्रकल्पाचा मूळ हेतू राबवून मत्स्यबीज वाजवी दरात उपलब्ध करावे. प्रकल्पग्रस्तांना दमदाटी करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी. प्रकल्पाची जमीन प्रकल्पग्रस्तांना परत देण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



