योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक
शिवशाही वृत्तसेवा, वाई, (प्रतिनिधी शुभम कोदे)
एकसर येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते आणि जीवनशैली अधिक निरोगी बनते, असे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. योगाभ्यासामुळे तणाव कमी होऊन आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते, याविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक गुरुनाथ राठोड, फुलचंद महागडे, संपदा घोडके तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून शाळेचा परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



