८ एकर जमिनीचे बक्षीसपत्र अखेर रद्द
शिवशाही वृत्तसेवा, लातूर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
वृद्धपकाळात मुला-नातवंडांचा आधार मिळेल, या आशेने आपल्या मालकीची ८ एकर जमीन नातू आणि पणतूंच्या नावावर करणाऱ्या लातूरमधील ९० वर्षीय हौसाबाई लहाडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नातवंडांकडून होणारी हेळसांड आणि दुर्लक्ष पाहून हौसाबाई यांनी दिलेला कायदेशीर लढा यशस्वी झाला असून, उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित बक्षीसपत्र रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे.
काय आहे प्रकरण?
हौसाबाई लहाडे यांनी आपल्या उतारवयात हक्काचा निवारा आणि प्रेमाचा आधार मिळेल, या अपेक्षेने स्वतःच्या मालकीची ८ एकर जमीन आपल्या नातू आणि पणतूंच्या नावावर 'बक्षीसपत्र' (Gift Deed) करून दिली होती. मात्र, जमीन नावावर झाल्यानंतर काही काळातच परिस्थिती बदलली. नातवंडांनी हौसाबाईंकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली, तसेच त्यांच्या संगोपन व देखभालीची जबाबदारीही झटकली.
प्रशासनाचा धाडसी निर्णय
कुटुंबीयांकडून झालेल्या या उपेक्षेमुळे व्यथित झालेल्या हौसाबाईंनी खचून न जाता उपविभागीय अधिकारी कार्यालयात धाव घेतली. 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम' या कायद्याचा आधार घेत त्यांनी दाद मागितली. या प्रकरणावर सुनावणी घेतल्यानंतर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नन्ने-विरोळे यांनी अत्यंत कडक भूमिका घेत बक्षीसपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.
केवळ बक्षीसपत्र रद्दच नाही, तर वसुलीचेही आदेश
या निर्णयामुळे संबंधित नातवंडांना केवळ जमीन गमवावी लागली नाही, तर या जमिनीवर त्यांनी आजवर घेतलेल्या सर्व शासकीय लाभांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक संदेश
लातूरमधील या निर्णयाने समाजात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. मालमत्तेच्या हव्यासापोटी ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी हा निकाल एक इशारा ठरला आहे. वृद्धपकाळात आई-वडिलांची जबाबदारी झटकणाऱ्यांना कायद्याचा विळखा बसू शकतो, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. या लढ्यामुळे हौसाबाई लहाडे यांच्यावर ओढवलेला अन्याय दूर झाला असून, त्यांच्या धाडसी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



