सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापतीपदी उमेश शेजूळ, उपसभापतीपदी काबरा अविरोध
शिवशाही वृत्तसेवा,सिंदखेड राजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक९ जून रोजी बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. यामध्ये सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेश शेजूळ तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे राहुल काबरा यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडी संदर्भात पुण्यनगरीने ६ जून रोजी सभापती-उपसभापती कोण होणार नावासह वृत्त प्रसिध्द केले होते, त्यानुसार सदर वृत्त अखेर तंतोतंत खरे ठरले.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सभापती व उपसभापती पदासाठी विविध नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, विद्यमान राजकीय समीकरणांनुसार सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर उपसभापतीपद शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे जाणे अपेक्षित होते. त्यानुसार सभापतीपदासाठी उमेश शेजूळ आणि उपसभापतीपदासाठी राहुल काबरा यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ संचालक असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे १०, शिवसेना (शिंदे गट) चे ४ आणि भाजपचे ४ सदस्य आहेत. बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतीपदावर दावा कायम ठेवला. सभापतीपदासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उमेश शेजूळ यांच्या नावाला पाठिंबा दिला, तर उपसभापतीपदी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी राहुल काबरा यांच्या गळ्यात पुष्पहार घालून निवडीची घोषणा केली. या निवड प्रक्रियेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून बी. जे. शेळके यांनी कामकाज पाहिले.
निवडीनंतर उमेश शेजूळ व राहुल काबरा यांचे समर्थकांनी घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याची भावना नवनिर्वाचित उपसभापती राहुल काबरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



