शिस्तभंग कारवाईला स्थगितीची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रांताध्यक्ष तथा विभागीय समिती सदस्य आ. विक्रम वसंतराव काळे यांनी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम.यांना निवेदन देऊन, शिक्षकांसाठी मुख्यालयी राहणे बंधनकारक करणाऱ्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असून, आदेशाचे पालन न करणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, शिक्षकांसाठी आवश्यक शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून न देता अशा प्रकारची कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे शिक्षक संघाने म्हटले आहे.
निवेदनात पंचायत राज समितीच्या शिफारशींचा उल्लेख करत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासाठी शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिक्षकांसाठी शासकीय निवास व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुख्यालयी राहण्याच्या अटीची अंमलबजावणी व्यवहार्य नसल्याचे संघाचे मत आहे.
याशिवाय, पती-पत्नी दोघेही शासकीय सेवेत असल्यास त्यांचे मुख्यालय कोणते मानायचे, तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत शासन परिपत्रकात स्पष्टता नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाकडून सर्वसमावेशक व स्पष्ट सूचना प्राप्त होईपर्यंत शिक्षकांवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करू नये, अशी मागणी आ. विक्रम काळे यांनी केली आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनामुळे शिक्षकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाला वाचा फुटली असून, मुख्यालयी राहण्याच्या धोरणाबाबत शासनाची भूमिका काय राहणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



