राजेंद्र राऊत सक्रिय ; महायुतीच्या बड्या नेत्यांची घेतली भेट
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी स्थानिक स्तरावर गाठीभेटी घेतल्यानंतर आता थेट मुंबई गाठली आहे. मुंबईत त्यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा केली.
महायुतीच्या नेत्यांशी सकारात्मक चर्चा
राजेंद्र राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सोलापूर मतदारसंघातील उमेदवारी दिल्याबद्दल महायुतीचे आभार मानले.
या भेटीदरम्यान आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. सोलापूर मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं आणि सर्व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून राजेंद्र राऊत यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकजुटीने निवडणूक लढवणार असून विजयाचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आरोग्य दूत मंगेश चिवटे आणि भाजप कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
या भेटीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात महायुतीची एकजूट स्पष्ट झाली असून, राजेंद्र राऊत यांनी प्रचाराच्या दृष्टीने आक्रमक सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



