आमदार नारायण पाटलांचा भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा
शिवशाही वृत्तसेवा,माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी )
विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक आणि मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी महायुतीचे (भाजप) उमेदवार राजेंद्र राऊत यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात असतानाही आमदाराने घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जेऊरमधील बैठकीत निर्णय
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार नारायण पाटील यांनी भाजप उमेदवारासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीला राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्याच उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आल्यामुळे या घडामोडिला मोठे राजकीय वजन प्राप्त झाले आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या हाय-व्होल्टेज बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, तसेच आमदार नारायण पाटील यांचे सुपुत्र व जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिते-पाटलांची रणनीती की भाजपची मोर्चेबांधणी?
आमदार नारायण पाटील हे जिल्ह्यात मोहिते-पाटील समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याशी जवळीक साधणे पसंत केले होते. पक्षादेशाला (Whip) बाजूला ठेवून नारायण पाटलांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे, भाजपने आगामी लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्यात मोठी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
राजकीय समीकरणे बदलणार
शरद पवार गटाच्या आमदाराने थेट भाजपच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीची सर्व गणिते उलथीपालथी झाली आहेत. आता या धक्कादायक घडामोडीवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि आमदार पाटलांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



