सुट्ट्यांमुळे मोठा अनर्थ टळला, जि.प. अध्यक्षांकडून प्रत्यक्ष पाहणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
चिलेवाडी (ता. कोरेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली व नुकसानीचा आढावा घेतला. सुदैवाने शाळेला सध्या सुट्ट्या असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चिलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही जुनी दगडी इमारत १९५४ मधील असून ती अत्यंत जीर्ण झाली होती. वादळी पावसामुळे या इमारतीची एक भिंत कोसळली. ही इमारत वापरण्यास धोकादायक असल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून जि. प. अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून निर्लेखनाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देश दिले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने डॉ. शिंदे यांनी शिक्षण व बांधकाम विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले. चिलेवाडी येथील शाळेच्या जागेवर तळमजल्यावर अंगणवाडी आणि पहिल्या मजल्यावर प्राथमिक शाळा अशा स्वरूपाची 'आदर्श संयुक्त इमारत' उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, स्मार्ट स्कूलच्या निकषांनुसार येथे तातडीने किमान चार नवीन वर्गखोल्या मंजूर करून आधुनिक इमारत उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
"विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची पहिली प्राथमिकता आहे," असे स्पष्ट करत डॉ. शिंदे यांनी शाळेच्या उर्वरित खोल्यांमध्ये वर्ग न भरवण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांची तात्पुरती सोय गावातील हायस्कूलच्या इमारतीत करण्याबाबत शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत.
"जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे ज्या ज्या जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांची तातडीने पाहणी करण्यात येत आहे. दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेतली जातील. नुकसानग्रस्त शाळांचा सविस्तर अहवाल तयार करून आवश्यक निधीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल." असेही डॉ. प्रिया शिंदे (अध्यक्षा, जिल्हा परिषद) म्हणाल्या.
चिलेवाडी येथील पाहणीनंतर डॉ. प्रिया शिंदे यांनी नागेवाडी येथील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेलाही भेट दिली. तेथील भौतिक सुविधांचा आढावा घेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना केल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, पंचायत समिती सदस्य, स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंते व अधिकारी तसेच चिलेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या आक्रमक आणि संवेदनशील भूमिकेबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



