अंगणवाड्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याचे सातारा झेडपीचे निर्देश
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे सातारा जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची दुरुस्तीची कामे तातडीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करा. आगामी पावसाळ्यात लहान बालकांना कोणतीही दुखापत किंवा इजा होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असे निर्देश सातारा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे यांनी दिले. सातारा जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
बैठकीत बोलताना सभापती शिंदे म्हणाल्या, "अंगणवाड्या हा केवळ आपल्या बालकांच्या शिक्षणाचा पाया नसून त्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा मुख्य केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाभूत सुविधा भक्कम असणे अत्यंत गरजेचे आहे." या बैठकीत अंगणवाडी विकास, महिला सक्षमीकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या महिला समुपदेशन केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे या बैठकीत कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही. तसेच, दि. ८ ते १५ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेले 'गंमत-जंमत' शिबीर आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला समितीच्या सदस्य शैलजा शिंदे, सारिका फाळके, पूजा मोरे, मृणाल पाटील, विजया थोरात, छाया जाधव, राजेश्वरी भोसले आणि अलका जगदाळे उपस्थित होत्या. तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
"लहान मुलांचे आरोग्य, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीवर आधारित योजनांना गती देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या भागातील प्रत्येक बालक सुरक्षित वातावरणात शिकावे आणि प्रत्येक महिलेला विकासाची समान संधी मिळावी, यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारीने काम करावे," असे आवाहन यावेळी करण्यात आले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



