सुरूर–पोलादपूर रस्त्याचा बोजवारा

ट्रॅफिक पोलिसाने हातात फावडे घेत बुजवला खड्डा, निकृष्ट कामावर संतापाचा उद्रेक

Poor quality road work, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

 महाबळेश्वर–पाचगणी या जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या सुरूर–पोलादपूर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत असून, शासनाच्या आशीर्वादामुळेच संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात वाई तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर वाई वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांनी स्वतः हातात फावडे घेऊन खडी टाकत मोठा खड्डा बुजवला. वाहतुकीचा धोका कमी करण्यासाठी पोलिसाला रस्ता दुरुस्त करण्याचे काम करावे लागणे ही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारासाठी मोठी शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

गांधी पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामावरही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप होत असून, कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराविरोधात एकाही लोकप्रतिनिधीने किंवा राजकीय नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नसल्याने संताप अधिकच वाढला आहे.

प्रसारमाध्यमांनी वारंवार या रस्त्याच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकूनही संबंधित ठेकेदारावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने "या ठेकेदाराच्या पाठीशी नेमका कोणाचा वरदहस्त आहे?" असा सवाल वाई शहरासह संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित कामाची तसेच त्यामागील प्रशासकीय व राजकीय जबाबदारीची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

या रस्त्याच्या कामामुळे गेल्या वर्षी परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. शेतातील सोयाबीनसह इतर पिकांवर धुळीचा जाड थर साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मात्र तरीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

महाबळेश्वर–पाचगणीकडे जाणारे अनेक पर्यटक आता या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करत असल्याने पर्यटनावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटनाचा दर्जा उंचावण्याच्या घोषणा करणाऱ्या शासनाने प्रत्यक्षात या महत्त्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीदवाक्याला साजेसा आदर्श ठेवत वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डा बुजवणारे ट्रॅफिक पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र पोलिसांनी रस्ते दुरुस्त करावेत आणि संबंधित यंत्रणा मात्र हातावर हात धरून बसावी, ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, शासनाने संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पुन्हा तयार करावा आणि या कामाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारावा, अशी जोरदार मागणी वाई शहरासह संपूर्ण तालुक्यातून होत आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !