भाजप जिंकल्यास मित्रपक्षांनाच दुय्यम वागणूक मिळणार; २०२९ मधील अडचणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीला साथ देण्याचे भावनिक आवाहन
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
"सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला, तरी हा पाठिंबा मनापासून आहे की राजकीय दबावापोटी, याचा विचार मतदारांनी करावा. जर भाजपचा उमेदवार चुकून निवडून आला, तर गुलाल खेळताना त्यांचे कार्यकर्ते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच (अजित पवार गट) लोकप्रतिनिधींना चिडवतील आणि 'आम्ही कसे डोक्यावर बसलो' अशा बढाया मारतील. त्यामुळे आपल्या नेत्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि २०२९ मधील अडचणी टाळण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या," असे रोखठोक व भावनिक आवाहन मविआचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केले आहे.
स्थानिक नेत्यांशी असलेल्या दोन पिढ्यांच्या संबंधांना उजाळा
सातारा जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराण्यांशी असलेल्या कौटुंबिक संबंधांना उजाळा देत जगताप म्हणाले की, "छत्रपती घराणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या सर्वांशी माझे दोन पिढ्यांचे संबंध आहेत." त्यांनी काही महत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला:
शिवेंद्रसिंहराजे भोसले: त्यांचे वडील अभयसिंहराजे आणि माझे वडील वर्गमित्र होते, त्यांच्यामुळेच माझे नाव 'अभयसिंह' ठेवले गेले.
मकरंद पाटील: यांच्या वडिलांच्या काळात माझे वडील जिल्हा परिषद सदस्य होते.
शंभूराज देसाई: ते मंत्री असताना माझी आई शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्या होती.
"आज केवळ राजकीय अपरिहार्यतेमुळे या नेत्यांना भाजप उमेदवाराचा प्रचार करावा लागत असला, तरी त्यांच्या मनातील खरा उमेदवार मीच आहे," असा दावाही जगताप यांनी केला.
भाजपचा उमेदवार जिंकल्यास मित्रपक्ष ठरतील दुय्यम'
भाजपवर हल्लाबोल करताना जगताप यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना सतर्कतेचा इशारा दिला. "भाजपचा उमेदवार जिंकल्यास फलटण, सातारा, वाई आणि पाटण भागात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना व जिल्हा परिषद सदस्यांना दुय्यम वागणूक दिली जाईल. आज जर भाजपला रोखले नाही, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत याच नेत्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढतील. अनेक नेत्यांच्या मनात सध्याच्या परिस्थितीबद्दल राग आहे, पण ते व्यक्त करू शकत नाहीत. मतदारांनी केवळ त्यांच्या शब्दांवर न जाता त्यांच्या भावना ओळखून मतदान करावे," असे ते म्हणाले.
विचारधारा टिकवण्यासाठी 'वादळातील दिव्यासारखा' संघर्ष
देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोट ठेवत जगताप यांनी भाजपच्या विचारधारेवर कडाडून टीका केली. "शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा पुसून आरएसएसचा अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मोठ्या शक्तीविरोधात, नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असतानाही मी स्वाभिमानासाठी खंबीरपणे उभा आहे. वादळात पेटलेल्या दिव्यासारखा माझा हा संघर्ष आहे. या लढाईत सातारा-सांगलीतील स्वाभिमानी मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहावे," असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
-----------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा








