शाळे कडून पुस्तके, गणवेश व शाळेचे साहित्य मिळाल्यामुळ विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आपुलकी निर्माण झाली
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुगाव येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळा प्रवेशाचा हा दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने संपूर्ण शाळा परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. या प्रसंगी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह विशेष स्वच्छता किट, मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वितरण करून त्यांचे शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे तसेच वाई पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मेटकरी यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य दिनकर शिंदे म्हणाले की, "आजच्या स्पर्धेच्या युगातही जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. येथील शिक्षकांचे प्रयत्न आणि शैक्षणिक दर्जा अत्यंत उत्तम दर्जाचा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांचा विकास व्हावा यासाठी येथे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. शासनाकडूनही विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय साहित्य आणि पोषण आहार यांसारख्या अनेक दर्जेदार सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे पालकांनी कोणत्याही भ्रमात न पडता मराठी शाळांवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना येथे प्रवेश द्यावा."
या उत्साही सोहळ्याला मुगावच्या सरपंच सविता सोंडकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुषमा महांगरे, महेश शिंदे, तस्लिम सय्यद, अर्चना सोंडकर, प्रिया महांगरे, वैशाली फणसे, पूजा महांगरे, मोहिनी कुंभार, अर्चना वैराट, अंगणवाडी सेविका विमल फणसे, लता कुंभार, रुचिता गोळे तसेच ग्रामसेवक दीपक जाधव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके आयोजन मुख्याध्यापिका अर्चना थोरवे व उपशिक्षक दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पहिल्याच दिवशी हातात नवीन पुस्तके, सुंदर गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी कमालीची आपुलकी निर्माण झाली असून, मुगाव शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक आणि दिमाखदार पद्धतीने झाली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा









