कदम-मोहिते-भोसले नेतृत्वाची एकजुट; सहकार पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा,सातारा प्रतिनिधी शुभम कोदे
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, लोकनेते स्व. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील "लोकतीर्थ" या स्मृतिस्थळी आयोजित केलेला सभासद संवाद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि ऐतिहासिक गर्दीत संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दिग्गजांनी एकाच मंचावर येत सहकार पॅनेलच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला
मेळाव्याची सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व मान्यवरांनी सहकार महर्षी स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या "लोकतीर्थ" या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. "सहकार क्षेत्राला लोकचळवळीचे स्वरूप देत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कदम साहेबांनी आयुष्यभर कार्य केले. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी त्यांनी उभारलेल्या सहकार, शिक्षण व सामाजिक संस्थांनी विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे," असे मत नेत्यांनी व्यक्त केले.
सहकाराची मूल्ये जपत शेतकरी, सभासद आणि कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सभासदांचा विश्वास आणि सहकार्य यांच्या बळावर विकासाची ही यशस्वी परंपरा अधिक बळकट करत, कृष्णा कारखान्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प या मेळाव्यात बोलून दाखवण्यात आला.
या मेळाव्याला सोनहिरा कारखान्याचे चेअरमन आ. मोहनराव कदम, आ. डॉ. विश्वजीत कदम, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, आ. डॉ. अतुल भोसले, सागरेश्वर सूतगिरणीचे माजी चेअरमन डॉ. शांताराम कदम, रघुनाथराव कदम, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम, कडेगाव पंचायत समिती सदस्य दिग्विजय कदम आणि सुदन मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.
या संवाद मेळाव्याला कृष्णा कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव आणि कार्यकर्ते अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर 'सहकार पॅनेल'च्या घोषणांनी आणि उत्साहाने ढवळून निघाला होता.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



