जिद्द शेतकरी कन्येची

व्याहळीच्या भाग्यश्री थोरवे बनल्या वाईच्या पश्चिम भागातील पहिल्या महिला PSI

Bhagyashree Thorve becomes a PSI, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

 जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ग्रामीण भागातील एका शेतकरी कन्येने यशाचे शिखर गाठत वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे. व्याहळी कॉलनी येथील भाग्यश्री विद्या विजय थोरवे यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आपले एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पदाची शपथ घेतली. वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील पहिली महिला पोलीस अधिकारी बनण्याचा बहुमान त्यांनी पटकावला असून, त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. नाशिक येथील दीक्षांत संचलन सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाग्यश्री थोरवे यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

     भाग्यश्री यांचे वडील विजय थोरवे आणि आई विद्या थोरवे हे दोघेही शेतकरी आहेत. अत्यंत साध्या आणि ग्रामीण परिस्थितीतून पुढे येत भाग्यश्री यांनी हे यश संपादन केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा (व्याहळी कॉलनी), माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल (वाई) तर बी.कॉम. पदवी किसनवीर महाविद्यालय (वाई) येथून झाली. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.कॉम.ची पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केली.

     अभ्यासातील सातत्य आणि मेहनतीमुळे त्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांनी एमपीएससी २०२२ मधून पोलीस उपनिरीक्षक आणि २०२३ मध्ये महसूल सहाय्यक अशा दोन्ही पदांवर निवड मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. त्यांनी खाकी वर्दीची निवड करत नाशिक येथे शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणी, कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हे अन्वेषण या सर्व आघाड्यांवर उत्कृष्ट प्रशिक्षण पूर्ण केले.

     थोरवे कुटुंबात देशसेवा आणि कर्तव्याची मोठी परंपरा पाहायला मिळते. भाग्यश्री यांचा धाकटा भाऊ सध्या भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावत आहे, तर मोठा भाऊ देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. आता भाग्यश्री यांच्या रूपाने कुटुंबात आणि गावात पहिली वर्ग-२ ची अधिकारी मिळाल्याने पालकांचे डोळे कौतुकाने पाणावले आहेत.

     भाग्यश्री थोरवे यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून, वाई तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू व महत्त्वाकांक्षी मुलीच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे आहे. परिस्थिती कशीही असली तरी मेहनती समोर ती झुकते, हेच भाग्यश्री यांनी दाखवून दिले आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल व्याहळी कॉलनीचे ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार आणि वाई तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     दरम्यान, "शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणून इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आई-वडिलांचे कष्ट आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच मी आज अधिकारी बनू शकले. पोलीस अधिकारी म्हणून काम करताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणे हेच माझे ध्येय असेल," असे भाग्यश्री थोरवे (नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक) यांनी यावेळी सांगितले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !