९ जणांचा जीव थोडक्यात बचावला पण वाई पालिकेचा बेजबाबदार कारभार उघड

सूचनाफलकाविना खोदलेल्या खड्ड्यात भाविकांची ट्रॅव्हलर कोसळली

Bad road causes accident, municipal council, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई नगरपालिकेच्या निष्काळजी, बेजबाबदार आणि जीवघेण्या कारभारामुळे रविवारी एक भीषण अपघात घडला. स्वामी समर्थ मठाजवळील तिकाटणे येथे पाणी योजनेच्या व्हॉल्वच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला होता; मात्र त्या ठिकाणी ना सूचनाफलक, ना बॅरिकेड्स, ना कोणतीही सुरक्षा व्यवस्था! परिणामी, पुण्याहून मांढरदेव दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर थेट गटारात कोसळून शेजारच्या घरावर आदळली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि दैव बलवत्तर असल्याने ट्रॅव्हलरमधील ९ भाविक मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बचावले.

संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने वाई पालिकेच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. हा रस्ता वाई एमआयडीसीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग असतानाही पालिकेने सुरक्षेच्या प्राथमिक नियमांनाही केराची टोपली दाखवली. रोज हजारो वाहने धावणाऱ्या या मार्गावर उघडा खड्डा ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार पालिकेला कोणी दिला, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रॅव्हलर बाहेर काढण्यात आली. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक आणि मालकावर हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. मात्र या नुकसानीची जबाबदारी स्वीकारण्यास पालिका प्रशासन तयार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी पाणी योजनेच्या व्हॉल्वच्या दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार रस्ता खोदला जातो. अनेकवेळा हा व्हॉल्व रस्त्याच्या बाजूला हलविण्याची मागणी करूनही पालिका प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे, स्थानिक लोकप्रतिनिधीही या गंभीर प्रश्नावर मौन बाळगून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेल्या या खेळाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडूनही पालिकेला जाग आलेली नाही. ट्रॅव्हलर बाहेर काढली; पण जीवघेणा खड्डा तसाच उघडा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी एखादा दुचाकीस्वार, सायकलस्वार किंवा पादचारी या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला किंवा जीव गेला, तर त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी कोण घेणार? वाई नगरपालिका की निष्क्रिय लोकप्रतिनिधी?

वाईकरांमध्ये या प्रकारामुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे. "निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?" असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने तातडीने हा खड्डा बुजवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी; अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

नागरिकांचा रोष स्पष्ट आहे

"वाई पालिकेचा हा कारभार केवळ निष्काळजीपणाचा नाही, तर थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा आहे. आता तरी प्रशासन जागे होणार, की आणखी एका दुर्घटनेची वाट पाहणार? 

पाणीपुरवठा सभापतींची नैतिक जबाबदारी कुठे?

रस्ता खोदला गेला, पण सुरक्षा उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? सूचनाफलक, बॅरिकेड्स आणि इशारा फलक का लावले गेले नाहीत? या निष्काळजीपणाची जबाबदारी नेमकी कोणाची?

पाणीपुरवठा विभागाच्या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पाणीपुरवठा सभापती यांच्यावर आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारीही त्यांनी स्वीकारणे अपेक्षित आहे. चांगले काम झाल्यावर श्रेय स्वीकारले जाते, तर अशा जीवघेण्या हलगर्जीपणाची जबाबदारीही तितक्याच धैर्याने स्वीकारली पाहिजे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर किंवा ठेकेदारांवर दोष ढकलून जबाबदारीतून पळ काढणे हा पर्याय असू शकत नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या प्रकाराबद्दल सभापतींनी सार्वजनिक खुलासा करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही याची ठोस हमी द्यावी. पद म्हणजे केवळ सत्कार, उद्घाटने आणि श्रेय घेण्यासाठी नसते; संकटाच्या वेळी जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही तितकीच आवश्यक असते. नागरिक आता उत्तरांची अपेक्षा करत आहेत जबाबदारी स्वीकारणार, की मौन बाळगणार? 

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !