पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय होणार कार्यान्वित
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
प्रशासकीय कामांसाठी होणारा नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचवण्यासाठी सोलापूर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंढरपूर येथे नव्याने अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले असून, याची अधिसूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी २५ जून रोजी प्रसिद्ध केली आहे.
नागरिकांची मोठी गैरसोय टळणार
या निर्णयामुळे माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा, मोहोळ आणि पंढरपूर या सात तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत महसूलविषयक विविध कामांसाठी या सात तालुक्यातील नागरिकांना लांब अंतराचा प्रवास करून सोलापूरला जावे लागत होते. मात्र, आता ही सर्व कामे त्यांच्या जवळच असलेल्या पंढरपूर येथे होणार असल्याने, नागरिकांचा अनावश्यक प्रवास आणि वेळ वाचणार आहे.
प्रशासकीय विभागणी कशी असेल?
पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय: माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा, मोहोळ आणि पंढरपूर हे सात तालुके जोडण्यात आले आहेत.
सोलापूर अपर जिल्हाधिकारी कार्यालय: बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांचे कामकाज सोलापूर येथूनच चालेल.
विशेष नोंद
मोहळकरांना आता महसूलविषयक कामांसाठी पंढरपूरची वारी करावी लागणार आहे, तसेच सोलापूरजवळील लांबोटी, सावळेश्वर, वडवळ यांसारख्या गावांनाही आता कामासाठी पंढरपूरला यावे लागणार आहे.
हरकतींसाठी मुदत
या निर्णयाबाबत कोणास काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्या ९ जुलैपर्यंत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापना शाखेकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी केले आहे. सर्व हरकतींवर सुनावणी घेऊन १२ जुलैपर्यंत अंतिम अहवाल शासनास पाठविला जाणार आहे, त्यानंतर हे कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित होईल.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



