संघटन हीच भाजपची खरी ताकद - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात रणनीती निश्चित!
शिवशाही वृत्तसेवा, सातारा, (प्रतिनिधी शुभम कोदे)
भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा विभागीय आढावा बैठक नुकतीच सातारा येथे उत्साहात संपन्न झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाज, पक्षविस्तार आणि जनसंपर्क अभियान गतिमान करण्यासाठी या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. तसेच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाची विचारधारा व विकासाची गती पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन
या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे, प्रदेश उपाध्यक्ष व विभाग संयोजक विक्रम पावसकर, विभाग सहसंयोजक विक्रम देशमुख आणि अभियान प्रदेश सहसंयोजक आमदार विक्रम पाचपुते प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नेत्यांनी पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. 'संघटन हीच भारतीय जनता पार्टीची खरी ताकद असून कार्यकर्त्यांच्या समर्पण, निष्ठा आणि अथक परिश्रमाच्या बळावर पक्ष अधिक व्यापक स्वरूपात जनसेवेचे कार्य पुढे नेईल,' असा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्षाची ताकद वाढवण्यावर भर
बैठकीत केंद्र आणि राज्यातील सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा पाढा वाचण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकसित भारताच्या संकल्पनेला आणि राज्यातील महायुती सरकारच्या विकासाभिमुख नेतृत्वाला बळ देण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि घराघरात जाऊन जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या निर्धारामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळाला.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



