बीड जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत बीबी येथील दोन महिला भाविक मृत्युमुखी
शिवशाही वृत्तसेवा,सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सिंदखेडराजा तालुक्यातील बीबी येथील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. बुधवारी नदी पार करण्यासाठी भाविकांनी भरलेली बोट गोदावरी नदीच्या मध्यभागी पोहोचताच अचानक तोल जाऊन उलटली. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे.
माहितीनुसार, बोटीत सुमारे 40 ते 50 प्रवासी होते. बोट उलटल्यानंतर सर्व प्रवासी नदीत पडले. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाच्या मदतीने अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र बीबी येथून यात्रेसाठी गेलेल्या प्रणिला शेषेराव राठोड (वय 65) व कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय 65) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बीबी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, यात्रास्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बोटीतून प्रवास करणाऱ्या भाविकांना लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची तसेच गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



