साताऱ्यात पालिकेचा 'बुलडोझर पॅटर्न'! समर्थ मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त, 'शाहूपुरी चौका'चा नंबर कधी?
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे नगरपालिकेने बुलडोझर कारवाई करून ती पाडली आहेत. रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे शिवधनुष्य सातारा नगरपालिकेने हाती घेऊन प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी या माध्यमातून सुरू केली आहे. सातारा नगरपालिकेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे आता या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिकेने हाती घेतलेले काम कौतुकास्पद आहे. या मार्गावरील अतिक्रमण हटावामुळे आता कास सज्जनगड या परिसरात तसेच परळी व अन्य ग्रामीण भागातून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना सुलभ होणार आहे. विशेषता सातारा कास हे जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असल्याने येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून असंख्य पर्यटक कास निसर्ग सौंदर्याला भेटी देत असतात. या पर्यटकांना ये जा करण्यासाठी समर्थ मंदिर चौकातूनच पुढे जावे लागते. मागील पाच सहा वर्षात या परिसरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पर्यटकांना या मार्गावरून प्रवास करणे कठीण जात होते. याची गंभीर दखल घेत सातारा नगरपालिका प्रशासनाने या परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचा निर्धार केला त्याप्रमाणे या भागातील अतिक्रमणे आता हटवले आहेत. अदालत वाडा ते समर्थ मंदिर चौक परिसरात असंख्य अनधिकृत अतिक्रमणे भुईसपाट झाल्याने आता येथील अरुंद रस्ते रुंद झाले आहेत. नागरिकांमधून या कृतीचे समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने मनावर घेतले तर अशक्य ते शक्य करता येते हेच यावरून दिसून येते. साताऱ्यातील वाढते अतिक्रमणे हा चिंतेचा विषय ठरत असताना सातारा नगरपालिका प्रशासनाने घेतलेली कडक भूमिकेमुळे अतिक्रमण माफियांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील विविध भागातील असणारे अतिक्रमणे याच पद्धतीने हटवली पाहिजेत अशी भूमिका साताऱ्यातील नागरिकांची आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणे या विषयाला आता गती मिळाली असून समर्थ मंदिर चौकापासून यास प्रारंभ झाला आहे. सातारा शहरातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय कारवाईलाही आता वेग येऊ लागला आहे. आपले शहर स्वच्छ व अतिक्रमण मुक्त व्हावे हे धोरण नगरपालिका प्रशासनाने ठेवल्यामुळेच साताऱ्यात बुलडोजर कारवाई प्रारंभ झाला आहे. सातारा नगरपालिकेच्या १६५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच शहरात बुलडोजर कारवाई होत असल्याने याचा धसका आता अतिक्रमण माफियाने घेतला आहे. सुरक्षित वाहतूक व नागरिकांचा सुरक्षित प्रवास यामुळे आता शक्य होणार आहे. शहरातील विविध भागात असणारे अतिक्रमण याकडेही सातारा नगरपालिकेने लक्ष घालून ही अतिक्रमणे हटवली पाहिजेत यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेषता शाहूपुरी चौक हा सध्या अपघाताचा केंद्र म्हणून ओळखले जात असून या ठिकाणी व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने व त्यांनी केलेले अतिक्रमणे या चौकातील अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरत असून ये जा करणे ही नागरिकांना कठीण जात आहे. शाहूपुरी चौकात ही समर्थ मंदिर चौक प्रमाणे बुलडोझर कारवाई व्हावी अशी सातारकर यांची मागणी आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी बरोबरच घडणारे अपघात मृत्यूला कारणीभूत ठरत असून अतिक्रमणे वाढल्यामुळेच हा चौक सध्या अरुंद झाला आहे.
सातारा शहरालगत असलेले शाहूपुरी परिसरातील शाहूपुरी चौक हा अपघाताचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जात आहे. या चौकात व्यवसायिकांनी केलेले अतिक्रमण नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढलेली असल्याने वाहनांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या चौकातून ये जा करणाऱ्या नागरिकांबरोबरच वाहनांची संख्या अधिक असल्याने शाहूपुरी चौकात वाहतुकीची कोंडी नियमितपणे होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातून आयटीआय मोळाचा ओढा कोंडवे याकडे जाण्यासाठी नागरिकांना व वाहन चालकांना या चौकातून जावे लागते तसेच आंबेदरे, दिव्यनगरी,माळवाडी या भागातील नागरिकांना शहरात येताना या चौकातून ये जा करावी लागते त्यामुळे या चौकातील अतिक्रमणे नगरपालिका प्रशासनाने दूर करून नागरिक व वाहनचालकांना दिलासा द्यावा.
श्रीरंग काटेकर ,सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



