ग्रामस्थांचा सहभाग आणि अथक परिश्रमांना मोठे यश - सातारा जिल्ह्याच्या विकास नकाशावर परखंदीचे नाव अभिमानाने
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
'मुख्यमंत्री पंचायत अभियाना'त वाई तालुक्यातील परखंदी गावाने प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी सिद्ध करत संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल परखंदी गावाला तब्बल २५ लाख रुपयांचे भव्य बक्षीस जाहीर झाले आहे. गावाने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, परखंदी गाव आता वाई तालुक्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या विकास नकाशावर अभिमानाने झळकू लागले आहे.
वाई तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींमधून अंतिम २० ग्रामपंचायतींची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होती. या चुरशीच्या स्पर्धेत परखंदी गावाने आपल्या उल्लेखनीय कामाच्या जोरावर अव्वल स्थान प्राप्त केले. भवानी माता व काळभैरव नाथसाहेबांच्या कृपेने आज परखंदी गाव विकास, एकता आणि लोकसहभागाचे एक प्रेरणादायी मॉडेल बनले आहे.
परखंदी गावाला लाभलेले हे यश केवळ एका रात्रीत मिळालेले नाही, तर त्यामागे संपूर्ण गावाची एकजुट आणि कष्ट कारणीभूत आहेत. गावाच्या विकासकामांत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवला, गावाने एकजूट दाखवत सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपली, अशी लोकसहभागातून गावात राबवण्यात आलेली स्वच्छता मोहीम आणि पायाभूत विकासकामे ही इतर गावांसाठी आदर्श ठरली आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



