एकसर पार्टेवाडीत पहाटे धाडसी चोरी - वाई तालुक्यात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील पश्चिम भागातील एक्सर पाटेवाडी येथे पहाटेच्या सुमारास घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात अक्षरशः खळबळ उडाली आहे. तोंडाला पांढरे कापड बांधलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश करत वृद्ध दांपत्याला मारहाण केली आणि सुमारे एक लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकसर पार्टेवाडी येथील शिवाजी देशमुख (आण्णा) आणि त्यांची पत्नी सुमन देशमुख हे दोघे घराच्या पडवीत झोपले होते. तर सुटीसाठी गावी आलेला त्यांचा नातू पंकज देशमुख हा घरातील बेडरूममध्ये झोपला होता. पहाटे सुमारे तीनच्या दरम्यान मोठा आवाज झाल्याने सुमन देशमुख यांना जाग आली. तोपर्यंत तोंडाला पांढरे कापड बांधलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता.घरात घुसल्यानंतर चोरट्यांनी कपाटांची उचकापाचक करत सोने आणि रोकड शोधण्यास सुरुवात केली. यावेळी सुमन देशमुख यांनी उशाजवळ ठेवलेले सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरट्यांच्या नजरेस पडले. त्यातील एका चोरट्याने ते तात्काळ हिसकावून घेतले. तसेच कानातील सोन्याची फुले खेचण्याचाही प्रयत्न करण्यात आला; मात्र ती खाली पडल्याने चोरट्यांना ती घेऊन जाता आली नाहीत.दरम्यान, विरोध करण्याचा प्रयत्न करणारे शिवाजी देशमुख यांना चोरट्यांनी खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे वृद्ध दांपत्य भयभीत झाले होते. दुसरीकडे, बेडरूममध्ये झोपलेल्या पंकज देशमुख यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केल्याचे लक्षात आले. खिडकीतून पाहिले असता चारही चोरटे घटनास्थळावरून पळून जाताना दिसल्याचे त्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पंकज कल्याण देशमुख यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वाई तालुक्यात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम भागात वाढत्या चोरी, घरफोडी आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अक्षरशः भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, वाई पोलीस ठाण्यात मनुष्यबळाची मोठी कमतरता असून, कमी कर्मचारी संख्येमुळे विद्यमान पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. यामुळे गुन्हे रोखण्यात अडचणी निर्माण होत असल्याची चर्चा आहे.वाईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, पोलीस अधीक्षकांनी तात्काळ वाई पोलीस ठाण्यास अतिरिक्त पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या गस्तीत वाढ करून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



