लाईक्सच्या मागे धावताना आयुष्य विसरू नका - डॉ विनोद बाबर

वाई वसंत व्याख्यानमालेचे बारावे पुष्प

Lecture on mobile effect, Dr. Vinod babar, Vasant vyakhyanmala, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई वसंत व्याख्यानमालेच्या बाराव्या पुष्पात “जगलात तरच आयुष्य सुंदर आहे” या विषयावर प्रा डॉ विनोद बाबर यांनी अत्यंत हृदयस्पर्शी आणि वास्तववादी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अनुराधा कोल्हापुरे होत्या.  

आपल्या व्याख्यानात डॉ विनोद बाबर यांनी वेळेचे महत्त्व, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कुटुंबातील नात्यांतील दुरावा, पालकत्व, मानसिक ताणतणाव आणि वर्तमानात जगण्याची गरज यावर प्रभावी भाष्य केले. ते म्हणाले  “जगात सगळ्यांना सारखीच वेळ मिळालेली आहे. प्रत्येकाकडे चोवीस तासच असतात, मात्र त्याचा उपयोग कसा केला जातो यावर आयुष्य ठरते. ज्ञानेश्वर माऊलींना केवळ एकवीस वर्षे मिळाली, छत्रपती शिवाजी महाराजांना पन्नास वर्षे; पण शेकडो वर्षांनंतरही आपण त्यांना विसरलो नाही. पैसा, मालमत्ता किंवा वस्तू परत मिळू शकतात, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे कुणाचाही वेळ वाया घालवू नका. 

 आज मोबाईल आणि सोशल मीडियाने माणसाचे आयुष्य व्यापून टाकले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि सततच्या नोटिफिकेशन्समुळे माणूस स्वतःपासून आणि कुटुंबापासून दूर जात आहे. आज लोक प्रत्येक गोष्ट स्टेटसवर टाकून जगाला दाखवण्याच्या घाईत आहेत. पण आपल्या आनंदाचे प्रदर्शन करणे खरोखर गरजेचे आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आज लहान मुलांना आई-वडिलांपेक्षा मोबाईल अधिक जवळचा वाटतो. पालकदेखील ‘मोबाईलशिवाय मुलं जेवत नाहीत’ हे कौतुकाने सांगतात, ही चिंतेची बाब आहे. वस्तू वापरण्यासाठी असतात आणि माणसांवर प्रेम करण्यासाठी; पण आज उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.  

मुलांवर लहान वयातच स्पर्धेचे आणि यशाचे ओझे टाकले जात आहे. पालक मुलांचे मित्र होण्याच्या नादात त्यांना शिस्त लावणे विसरत आहेत. मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार द्या. संस्कार असतील तर ते शून्यातून विश्व उभे करू शकतात. आयुष्य हा पुन्हा न मिळणारा चित्रपट आहे. चांगले क्षण सेव्ह करता येत नाहीत आणि वाईट क्षण डिलीट करता येत नाहीत. म्हणून वर्तमानात जगायला शिका.  

आज मानसिक ताणतणावामुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅकसारख्या समस्या वाढत आहेत. घरातील घाण आपण लगेच साफ करतो; पण मनातील कचरा मात्र साठवत राहतो. सोशल मीडियावर हजारो मित्र असले तरी संकटात धावून येणारी माणसे कमी होत चालली आहेत. नात्यांची अवस्था आज फाटलेल्या कपड्यांसारखी झाली आहे. पूर्वी कपडे रफू करून वापरले जात, आज लगेच टाकून दिले जातात; तसेच नातीही सहज तोडली जात आहेत. जिवंतपणी माणसांशी प्रेमाने वागा. व्यक्ती गेल्यानंतर श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून ती परत येत नाही.  

संगत आणि सल्लागार यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. ‘फुटाणे मंदिरात प्रसाद होतात आणि बारमध्ये चकणा होतात’ संगती माणसाला घडवते किंवा बिघडवते. सल्लागार शकुनीसारखा असेल तर शंभरातले एकही वाचत नाही, पण श्रीकृष्णासारखा असेल तर पाचातल्याही एकालाही काही होत नाही. शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. पुढचा जन्म मिळेल की नाही हे माहीत नाही; पण आत्ताचा क्षण मात्र आपला आहे आणि तो मनापासून जगायला हवा,”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अमित वाडकर यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय श्रीमती मंगला अहिवले यांनी करून दिला.आभार सौ गायत्री पटवर्धन यांनी मानले. प्रायोजक उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे व मालाज फूड् प्रॉडक्ट्स यांचा सत्कार प्रा डॉ विनोद बाबर यांचे हस्ते करण्यात आला. व्याख्यानाला वाईकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !