कन्नड तहसील कार्यालयात 'खरीप आढावा बैठक' संपन्न - प्रशासकीय यंत्रणा सज्ज
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांचा कोणताही तुटवडा भासणार नाही, याची कडक दक्षता प्रशासनाने घ्यावी. विशेषतः युरिया खताची जादा दराने विक्री करणाऱ्या किंवा खतासोबत इतर वस्तूंची सक्ती (लिंकिंग) करणाऱ्या विक्रेत्यांची गय केली जाणार नाही. अशा तक्रारी येताच संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार संजनाताई जाधव यांनी दिले आहेत.
सोमवारी तहसील कार्यालयातील सभागृहात आयोजित तालुकास्तरीय खरीप आढावा बैठकीत त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय नियोजनाचा आढावा
बैठकीच्या सुरुवातीला उपविभागीय अधिकारी (SDM) संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत, कृषी उपविभागीय अधिकारी (SDAO) श्री. सुभाष आघाव आणि तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी पीपीटी (PPT) सादरीकरणाद्वारे तालुक्यातील खरीप नियोजनाची माहिती दिली. यामध्ये तालुक्यातील पीक पद्धती, उपलब्ध बियाणे साठा आणि खतांचे वाटप यांचे सूक्ष्म नियोजन मांडण्यात आले.
युरिया लिंकिंगवर कडक कारवाईचा इशारा
युरिया आणि इतर खतांच्या पुरवठ्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. युरिया विक्रीमध्ये पारदर्शकता राखण्याचे आवाहन करत आमदार महोदयांनी सांगितले की, "ज्या ठिकाणी बेकायदेशीर साठेबाजी किंवा लिंकिंगचे प्रकार घडत असतील, त्याची माहिती तात्काळ मला द्यावी. अशा प्रवृत्तींविरुद्ध मी स्वतः लक्ष घालून कडक कारवाई सुनिश्चित करेन." तसेच, दोषी विक्रेत्यांना पुन्हा परवाने देऊ नका, असेही त्यांनी कृषी विभागाला बजावले.
समन्वयाने काम करण्याचा निर्धार
या महत्त्वपूर्ण बैठकीला केतनभैय्या काजे, किशोर आबा पवार यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, कृषी विभागाचे कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आगामी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



