अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई.
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरातील रामडोह आळी परिसरातील इंद्रजा आयकॉन इमारतीमधील एका अनधिकृत गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत तब्बल ८०.७४ किलो वजनाचा व २ लाख ५९ हजार ४८४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सतीश पवार यांच्याविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अल्पना गायकवाड यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यवाही पूर्ण करत संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेतील कलमे १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६, २७, ३० व ५९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे आरोपी सतीश पवार यांच्यावर यापूर्वीही अवैध गुटखा विक्रीप्रकरणी चार ते पाच वेळा कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. तरीही शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू राहिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. वारंवार कारवाई होऊनही अवैध धंदे सुरूच कसे राहतात, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
धाडीदरम्यान आरएमडी पान मसाला, विमल पान मसाला, टोबॅको यांसह विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. संबंधित गोदामाला सील ठोकण्यात आले असून जप्त माल ताब्यात घेण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गोदाम मालक सतीश पवार हे बाहेरगावी असल्याचे सांगून घटनास्थळी उपस्थित राहिले नाहीत. वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांच्या उपस्थितीत गोदामाचे कुलूप तोडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण माल जप्त करून गोदाम सीलबंद करण्यात आले. या कारवाईनंतर वाई शहरात अवैध गुटखा, तंबाखू तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण का येत नाही, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या संदर्भातील आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे याचा तपास करत असून रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अल्पना गायकवाड यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन एस. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



