मेहकर पोलिसांकडून बनावट नाट्याचा पर्दाफाश
शिवशाही वृत्तसेवा, बूलढाणा (प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
हिवरा आश्रम परिसरातील धक्कादायक प्रकाराने खळबळ
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात अपहरणाचा बनाव रचून स्वतःच्या वडिलांकडे ४० तोळे सोन्याची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण कटाचा सूत्रधार अपहरण झाल्याचे सांगितला गेलेला मुलगाच असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मेहकर पोलिसांनी या बनावट अपहरण नाट्याचा पर्दाफाश करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर येथील चेतन काळे हा विद्यार्थी बीएससीचा पेपर देण्यासाठी मेहकर येथे आला होता. मात्र पेपर झाल्यानंतर तो घरी परतला नाही. काही वेळानंतर त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आणि धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये चेतन काळे हा हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसत होता. तसेच “मुलाला जिवंत पाहायचे असेल तर शेगाव रेल्वे स्टेशन येथे ४० तोळे सोने घेऊन या,” अशी धमकी देण्यात आली होती.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हिवरा आश्रम परिसरात अपहरणाची चर्चा सुरू होताच मेहकर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी CCTV फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे वेगवेगळी पथके तयार केली.
तपासादरम्यान नाशिक जिल्ह्यातील एका शेतातून चेतन काळे आणि त्याचा मित्र विवेक काकडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत दोघांनीही बनावट अपहरणाचा कट रचल्याची कबुली दिली.
आर्थिक अडचणीमुळे दोघांनी मिळून अनेक दिवसांपासून हा प्लॅन तयार केला होता. स्वतःचे अपहरण झाल्याचा बनाव रचून वडिलांकडून ४० तोळे सोने उकळण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा खुलासा तपासात झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही साथीदार सहभागी आहेत का, याचा तपास मेहकर पोलीस करत आहेत. या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




