दुःख सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर, खासदार उदयनराजेंनी दिला आधार
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. या दुर्घटनेमुळे सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात मर्ढे येथील उत्कर्ष शिंगटे (वय २१), प्रवीण शिंगटे (वय २५), आसगाव येथील महेश पवार (वय २५), आदित्य साळुंखे (वय २१), रितेश लोखंडे (वय २५), सुहास लोखंडे (वय २०), अंश चव्हाण (वय १८) आणि खटाव येथील संदीप काटकर (वय ३५) यांचा मृत्यू झाला होता.
खासदार उदयनराजे यांनी संबंधित गावांमध्ये जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. “मी त्यांच्या मुलाची किंवा भावाची जागा कधीच भरून काढू शकत नाही, मात्र मुलगा आणि भाऊ या नात्याने सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” असा शब्द त्यांनी कुटुंबीयांना दिला.
यावेळी परिसरातील नागरिकांनीही दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. संपूर्ण सातारा जिल्ह्यात या घटनेमुळे शोक व्यक्त केला जात असून दिवंगत तरुणांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



