सातारा शहरातील अतिक्रमणे कर्करोगाप्रमाणे फोफावतय

नगरसेवक सभागृहात प्रशासना विरोधात भिडले. गलथान कारभाराचा पंचनामा 

The problem of encroachment, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

नैतिकता व प्रामाणिकपणाच्या वल्गना करणारे जेव्हा कचखाऊ धोरण स्वीकारतात त्याचवेळी  अनैतिकतेचा बाजार सुरू होतो. सातारा शहरात याच वृत्तीने जोर पकडला असून शहराला चहुबाजूने अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. शहरातील अतिक्रमण हा विषय आता इतका गंभीर बनला आहे की त्याचे पडसाद नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत प्रथमच उमटले आहे. नगरसेवकांनी प्रशासना विरोधात दंड थोपटले आहेत. नागरिकांच्या प्रश्नावर प्रथमच नगरपालिकेच्या इतिहासात नगरसेवकांनी एकसंघपणे आवाज उठवल्याचे दिसून आले आहे.

रस्त्यावरील व रस्त्याकडेला झालेले व्यवसायिकांचे अतिक्रमामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हतबल झालेले नागरिक या अतिक्रमणाला आता कंटाळलेले आहेत. अतिक्रमणाची शहराला लागलेली वाळवी पाहता ती मुळापासून दूर करणे हे आता प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय मंडळी व प्रशासनाची अभद्र युती होते तेव्हाच अतिक्रमणाचा कर्करोगाप्रमाणे फैलाव  होतो याची प्रचिती सातारा शहरातील नागरिक सध्या अनुभवत आहेत. जिकडे तिकडे चोहीकडे अतिक्रमण वाढत असल्याने शहराला बकालतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जनतेचा आवाज भ्रष्ट यंत्रणे कडून दाबला जात असल्याने न्याय कोणाला मागावा हेच सर्वसामान्य जनतेला समजत नाही.

अर्थात नगरसेवकांनी धारिष्ट दाखवून नगरपालिकेच्या सभागृहात प्रथमच हा विषय ऐरणीवर आणून अतिक्रमण बाबतचा पंचनामा जाहीर केला. खरे तर या नगरसेवकांचे अभिनंदन करणे क्रमप्राप्त आहे. सातारा नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नगरसेवकांनी शहरातील अतिक्रमणाबाबत एक धाडसी पाऊल उचललेले आहे. रस्त्यावरील व्यावसायिक करणाऱ्यांनी जणू काय रस्त्याचा सातबारा आपल्या नावावरच केला आहे अशा थाटात ते आपले व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायिकांच्या अतिरेकी प्रवृत्तीमुळे शहरात ठीक ठिकाणी अनेक समस्या उभ्या राहत आहेत. विशेषता वाहतूक कोंडी त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

नियम व कायदे हे फक्त सर्व सामान्य नागरिकांनीच पाळावयाचे आणि व्यवसायिकांनी मात्र धुडगूस घालावयाचा असा काही खेळ साताऱ्यामध्ये सुरू आहे त्याला प्रथमच नगरसेवकांनी आवाज उठवून ब्रेक लावण्याची कामगिरी केली आहे. अतिक्रमण या विषयाबाबत सातारा नगरपालिकेच्या सभागृहात प्रथमच नगरसेवक आणि प्रशासन यांच्यामध्ये राडा झाल्याचे चित्र दिसून आले. खोलवर रुजलेली भ्रष्ट यंत्रणा याचा पंचनामाच या निमित्याने झाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील अतिक्रमणे वाढीला जबाबदार कोण याबाबत सभागृहात झालेली चर्चा पाहता आता या प्रवृत्तींचा नायनाट  होणे गरजेचे आहे असा मतप्रवाह सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. कर्करोगाप्रमाणे फोफावत चाललेले अतिक्रमण आता वेळेच रोखले नाही तर भविष्यात सातारा शहरातील रस्त्यावरून वाहने नव्हे तर चालणे फिरणे ही कठीण होऊन जाईल अशी गंभीर स्थिती सध्या झाली आहे. 

सातारा शहरातील नगरसेवकांनी याबाबत प्रथमच आवाज उठून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे. अर्थात हे उचललेले शिवधनुष्य त्यांनी शेवटपर्यंत मार्गी लावावे व साताऱ्यातील सर्व भागात विशेषता चांदणी चौक,मोती चौक, राधिका चौक राधिका रोड देवी चौक पोवई नाका गोडोली नाका एसटी स्टँड परिसर नेताजी सुभाष चंद्र बोस चौक परिसरात वाढलेली अतिक्रमणे विशेषता फुटपाथ वरील व्यावसायिकांचे अतिक्रमणे व रस्त्यावरील फेरीवाले ही प्रथम दूर करण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव वाढवावा अशी जनतेची अपेक्षा आहे. याच अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायिकांबरोबरच बिल्डर लॉबी यांचाही धुमाकूळ शहरातील विविध भागात अनुभवला मिळतो. अनेक भागात उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये पार्किंगची पुरेसे सोय न केल्यामुळे प्लॉट धारक आपली वाहने  रस्त्यावर उभी करून  ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी व वाहन चालकांसाठी अडथळा ठरत आहेत. 

अनेकदा यामुळे वाद-विवादाचे प्रसंग घडत आहेत. मुळात शहरातील आतील भागातील अरुंद रस्ते त्यात रस्त्यावरील लावलेली वाहने हे वाहतूक कोंडीला निमंत्रण देत आहेत. अर्थात या सर्व गोष्टींना भ्रष्ट यंत्रणा जबाबदार आहे. सध्या सातारा नगरपालिकेत भाजप प्रणित सत्ता असली तरी या सत्तेवर दोन्ही राजांचे वर्चस्व आहे. श्रीमंत छत्रपती खा उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनावर घेतले तर सातारा शहरातील अतिक्रमणे हा विषय कायमस्वरूपी निकालात निघेल अशी चर्चा सातारकरांमध्ये होत असते. 

सातारा शहरातील अतिक्रमणे बोकाळलेली आहेत यास भ्रष्ट यंत्रणा जबाबदार आहे. त्यात राजकीय आश्रय दात्यांची भर पडली आहे. मताच्या बेरजेच्या राजकारणापायी शहराला अतिक्रमणाचा विळखा पडत आहे. रस्त्यावर अथवा फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना ना शिस्त ना नियम त्यामुळे सोकावलेले या व्यवसायिकांनी संपूर्ण शहराला घेरले आहे. सर्वसामान्य सातारकर मात्र यामुळे त्रस्त आहे. सातारा शहरातील नगरसेवकांनी याबाबत आवाज उठविला व प्रशासनाचा भ्रष्ट यंत्रणेचा पंचनामा केला यावरून या प्रश्नाची गंभीरता लक्षात येते. 

श्रीरंग काटेकर सातारा

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !