शिरूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला वैयक्तिक संवाद; बूथ स्तरापासून संघटनात्मक फेरबदलाचे संकेत
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर (प्रतिनिधी; फैजल पठाण):
काँग्रेस पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत 'सृजन अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळून पक्ष अधिक बळकट होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक योगेश एच.सी. यांनी शिरूर येथे केले. शिरूर तालुक्यातील विविध पदांसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती आणि संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
बूथ पातळीवरील अहवाल दिल्लीला जाणार
या बैठकीत योगेश एच.सी. यांनी पुढे सांगितले की, "शिरूर तालुक्यातील सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी थेट चर्चा केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन एक विस्तृत अहवाल तयार केला जात असून, तो थेट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला (AICC) सादर केला जाईल." या अभियानामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
आता स्थानिक पातळीवरच होणार निर्णय:
रामहारी रुपनवर माजी आमदार रामहारी रुपनवर यांनी यावेळी बोलताना संघटनेतील उणिवांवर बोट ठेवले. ते म्हणाले, "बूथ पातळीवर संघटन काहीसे कमकुवत असल्याची जाणीव आम्हाला आहे. यापूर्वी छोट्या-मोठ्या निर्णयांसाठी कार्यकर्त्यांना मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. मात्र, आता तसे होणार नाही. स्थानिक पातळीवरच चर्चा करून निर्णय घेतले जातील. प्रत्येक कार्यकर्त्याचे मत ऐकले जात असून, त्यातूनच भविष्यातील नेतृत्व निवडले जाईल."
२०२६: संघटन बांधणीचे वर्ष
जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ष 'संघटन बांधणी वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. सृजन अभियान हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग असून, तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीसाठी निरीक्षक अनंत मोहक, विश्वजीत हापे, देविदास भन्साळी, कमलाकर सातव, कांतीलाल गवारे, वैभव यादव, संकेत गवारे, प्रियंका बंडगर, संतोष गव्हाणे, लहू निवंगुणे यांसह शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात, आबा गव्हाणे, सुरेश थोरात, निवृत्ती फंड, भरत भोसले, रघुनाथ गिरमकर, रघुनाथ शिंदे, सुरेश ढवळे, बजरंग पडवळ, अरुण फंड, सदाशिव वाळके, नितीन थोरात, माऊली पवार, भाऊसाहेब पवार यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



