युरिया, स्टार्चयुक्त दुधामुळे कॅन्सर, हृदयविकाराचा धोका - एआय वॉचच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
मानवी आरोग्यासाठी अमृत समजले जाणारे दूध आता सातारा जिल्ह्यासह शहरात 'पांढरे विष' ठरू लागले आहे. शरीरातील कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिनची गरज पूर्ण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे दूध भेसळ माफियांनी आपल्या नफेखोरीसाठी घातक बनवले आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावतीचा फायदा घेत जिल्ह्यात भेसळ माफियांचा गोरखधंदा जोरात सुरू असून, यावर प्रशासनाचे नेमके नियंत्रण कोणाचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि ते घट्ट दिसण्यासाठी माफियांकडून युरिया, स्टार्च आणि इतर आरोग्यास घातक ठरणाऱ्या रसायनांचा वापर केला जात आहे. हे भेसळयुक्त दूध थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. भेसळ माफिया जोमात आणि ग्राहक कोमात, अशी भयावह स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
गंभीर आजारांना निमंत्रण
तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यामुळे कॅन्सर, मूत्रपिंडाचे (किडनी) विकार आणि हृदयाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवत आहेत. भेसळीचा हा विळखा इतका घट्ट झाला आहे की, नागरिकांचे सरासरी आयुष्यमान खालावत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तूप, पनीर आणि दह्यातही भेसळ!
केवळ दूधच नव्हे, तर दैनंदिन आहारात महत्त्वाचे असणारे दही, तूप आणि पनीर यामध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ करून विक्री केली जात आहे. हॉटेल व्यावसायिकांपासून ते किरकोळ विक्रेत्यांपर्यंत या भेसळयुक्त पदार्थांचे जाळे पसरले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केवळ नावापुरती कारवाई न करता नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मुख्यमंत्री घेणार 'एआय'चा आधार
राज्यातील दूध भेसळीच्या गंभीर प्रश्नाकडे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष मिनीष शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा' (AI Watch) वापर करून भेसळ माफियांवर नजर ठेवली जाईल, असे सूचक संकेत दिले आहेत.
कठोर कारवाई करावी"दूध, दही, तूप आणि अगदी फळे-भाज्यांमध्येही भेसळीचे वर्चस्व वाढले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. संबंधित यंत्रणेने आता तरी झोपेतून जागे व्हावे आणि भेसळ माफियांच्या मुसक्या आवळून कडक कारवाई करावी."श्रीरंग काटेकर, सातारा
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




