५० कोंबड्यांचा आगीत होरपळून मृत्यू - भोकरदन तालुक्यातील घटनेत ५ लाखांचे नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन (प्रतिनिधी मजहर पठाण)
भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे शुक्रवारी (२४ एप्रिल) दुपारी एका विद्युत रोहित्राला (ट्रान्सफॉर्मर) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. बसस्थानक परिसरातील १०० केव्ही क्षमतेच्या या रोहित्राचा इन्सुलिटर अचानक फुटल्याने ही दुर्घटना घडली. या आगीत एक दुचाकी आणि बाजूलाच असलेले चिकनचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून, सुमारे ५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या आगीच्या विळख्यात रोहित्राच्या जवळच असलेले शुभम खराटे यांचे चिकनचे दुकान आले. आगीची तीव्रता जास्त असल्याने दुकानातील ५० जिवंत कोंबड्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. याशिवाय दुकानातील कुलर, वजनकाटा, खुर्च्या, पत्र्याचे शेड आणि इतर साहित्य जळून कोळसा झाले. दुकानाशेजारी उभी असलेली त्यांची दुचाकीही या आगीत पूर्णपणे खाक झाली. या दुर्दैवी घटनेत खराटे यांचे वैयक्तिक आणि वीज विभागाचे मिळून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांनी तातडीने वीज विभागाशी संपर्क साधून परिसराचा वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा, ही आग लगतच्या इतर दुकानांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे बीट जमादार प्रकाश शिनकर आणि तलाठी अमोल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व पंचनामा पूर्ण केला. महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रदीप गावंडे यांनीही भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली. यावेळी हिरालाल कोथलकर, अजिंक्य वाघ, गणेश गाडेकर, पत्रकार विशाल अस्वार, मिलिंद साळवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकसानभरपाईची मागणीहातावर पोट असलेल्या शुभम खराटे यांचे या आगीत सर्वस्व जळून गेले आहे. त्यामुळे शासनाने आणि वीज विभागाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन पीडित दुकानदाराला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वालसावंगी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




