खंडाळा तालुक्यात खळबळ - भरारी पथकाचा वॅगनआर गाडीला घेराव, कारवाईत ४२० लिटर दारू हस्तगत
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. सातारा भरारी पथकाने खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात एक धाडसी कारवाई करत अवैध हातभट्टी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या चारचाकीसह एकूण ४ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे रचला सापळा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला २० एप्रिल २०२६ रोजी शिरवळ परिसरात एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीर हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने शिरवळ परिसरात सापळा रचला. संशयास्पद वाटणाऱ्या मारुती सुझुकी वॅगनआर गाडीला पथकाने अडवून तिची कसून तपासणी केली असता, त्यात प्लास्टिकचे मोठे कॅन आढळून आले.
कारवाईचा तपशील आणि जप्त मुद्देमाल
तपासणीदरम्यान गाडीत ३५ लिटर क्षमतेचे एकूण १२ प्लास्टिक कॅन मिळून आले. यामध्ये ४२० लिटर हातभट्टी दारू असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वॅगनआर गाडी असा एकूण ४,४४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सदरची धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या मोहिमेत निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, सागर आवळे, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, अरुण जाधव आणि बाळासो पांचुदे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण करत आहेत.
नागरिकांना आवाहन"जिल्ह्यामध्ये कुठेही बनावट दारू किंवा हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल," असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांनी केले आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




