प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर, नागरिकांचा संताप उसळला
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
बावधन नाका ते मिशन हॉस्पिटल रिक्षा स्टँड दरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः “मृत्यूचा सापळा” ठरला असून, उडणारी प्रचंड धूळ, खड्डे आणि निष्काळजी दुरुस्तीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची जोरदार मागणी केली आहे.
सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराने बारिक खडी आणि कच टाकून केवळ दिखाऊ काम केल्याचा आरोप होत आहे. योग्य तांत्रिक पद्धतीने काम न केल्यामुळे रस्त्यावरून वाहन गेल्यानंतर धुळीचे प्रचंड लोट उडत आहेत. यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
रिक्षाचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेतली असता, संबंधित रस्ता एमएसआरडीसीच्या अखत्यारीत येतो, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार घडला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता केवळ चार-पाच कर्मचारी पाठवून “दिखावा” करण्यात आला. फोटो काढले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटांत झाडू मारल्याचा आव आणत घटनास्थळ सोडले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी अक्षरशः केराच्या टोपलीत फेकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रिक्षाचालकांना दिवसभर धुळीचा मारा सहन करावा लागत असून, अनेकांना श्वसनाचे गंभीर त्रास सुरू झाले आहेत. या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर टाकलेल्या सैल खडीमुळे घसरून आतापर्यंत अनेक दुचाकी अपघात झाले असून, चार ते पाच अपघातांची नोंद झाली आहे. अनेक जण जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, याच मार्गावर असलेल्या मिशन हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले यांनाही या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाच्या परिसरातही धुळीचे ढग उडत असल्याने ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.
नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या निष्काळजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव गेला, तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. “आणखी किती बळी गेल्यावर हे मस्तावलेले अधिकारी जागे होणार?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
स्थानिक रिक्षाचालक संघटनेनेही प्रशासनाला अंतिम इशारा दिला असून, संबंधित ठेकेदाराने तात्काळ रस्त्याची स्वच्छता करून दर्जेदार दुरुस्ती करावी. अन्यथा येत्या आठ दिवसांत समाधानकारक काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एकूणच, वाईतील हा रस्ता सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
वाई शहरातील नागरिक विचारत आहेत सातारा जिल्ह्याला चार मंत्री दोन खासदार असून सुद्धा सातारा जिल्ह्याचा विकास साधला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे आपल्या पक्षाचे नेते व पद मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मंत्र्यांनी नागरिकांना होणाऱ्या वेदनांची थोडी तरी जाण ठेवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्यातून होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




