अमित टिके आहेत यावर्षी बगाड्याचे मानकरी
![]() |
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वाई तालुक्यातील पांडे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री काळभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांची पारंपारिक 'बगाड यात्रा' मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या उत्सवाचा प्रारंभ झाला असून, शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
बगाड यात्रेची प्रक्रिया अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध असते. नाथसाहेबांच्या गाभाऱ्यात झालेल्या कौल प्रक्रियेत यंदा अमित प्रताप टिके यांना 'बगाड्या' होण्याचा बहुमान मिळाला आहे. कौल लागल्यापासून अमित टिके यांचा कडक उपास व वास्तव्य मंदिरामध्येच आहे. दररोज ब्राह्ममुहूर्तावर सोनेश्वर येथे स्नान करून, सूर्योदयापूर्वी गावातील सर्व मंदिरांत जलाभिषेक करण्याची खडतर सेवा ते पार पाडत आहेत.
पांडे येथील बगाडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याचा रथ. चैत्र पौर्णिमेला (हनुमान जयंती) हा रथ बांधण्यास सुरुवात होते. विशेष म्हणजे, या संपूर्ण रथात एकाही लोखंडी खिळ्याचा वापर केला जात नाही. पूर्णपणे लाकडी असलेला हा रथ आणि त्याची दगडी चाके हे स्थापत्यशास्त्राचे आणि श्रद्धेचे अजब मिश्रण आहे. एका रात्रीत हा भव्य रथ ग्रामस्थांच्या मदतीने उभा केला जातो.
३ एप्रिल रोजी पहाटे पौर्णिमा संपल्यानंतर बगाड रथ बैलांच्या साहाय्याने भैरवनाथांच्या मूळ ठाणाकडे प्रस्थान करेल. सकाळी मानाचे बगाडे सोमेश्वर येथे स्नान व धार्मिक विधी उरकून मुख्य मंदिरात येतील. दुपारी विधिवत पूजेनंतर बगाड्याला रथाला टांगले जाईल आणि शेतातून वाजत-गाजत हा 'मोठा खेळ' गावाकडे मार्गस्थ होईल. संध्याकाळी बगाड गावात आल्यावर श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा पार पडेल आणि रात्री ढोल-लेझीमच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये नाथांचा भव्य छबिना ग्रामप्रदक्षिणेसाठी निघेल. त्यानंतर आरती व गोंधळाच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल असे, पांडे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
यात्रेचे नियोजन करण्यासाठी एकूण सात खुते तयार करण्यात आले असून, यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे. "परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपणारा हा छोटेखानी गावातील मोठा खेळ पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन बगाड कमिटी, यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ मंडळ, पांडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




