हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजिन
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने वाई शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. 'जय श्रीराम'च्या जयघोषात आणि भगव्या ध्वजांच्या सावलीत निघालेल्या या यात्रेत हजारो रामभक्त उत्साहाने सहभागी झाले होते.
शोभायात्रेचा शुभारंभ वाई पोलीस ठाण्यापासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावून या सोहळ्याची शोभा वाढवली. यावेळी 'रामलल्ला'च्या घोषणांनी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
पोलीस ठाण्यापासून सुरू झालेली ही शोभायात्रा सिद्धनाथ वाडीमार्गे पुढे सरकली. त्यानंतर गणपती घाट आणि गंगापुरी अशा मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत संपूर्ण वाई शहरातून काढण्यात आली. ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत केले.
शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाई पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे ही यात्रा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
दरम्यान, "वाई शहराचा ऐतिहासिक वारसा आणि रामभक्तांचा उत्साह आजच्या या शोभायात्रेतून दिसून आला. हिंदू संस्कृतीचे संवर्धन आणि एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे," असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
तालुक्यातील सर्व स्तरांतील नागरिकांनी, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी केला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




