भाजी बाजारामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहरातील भगवा कट्टा परिसरापर्यंत सोमवारी भरत असलेल्या आठवडी बाजार पोचला आहे या भाजी बाजारामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पश्चिम भागातून येणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताही मोकळा मार्ग उपलब्ध राहत नाही. सोमवारी या परिस्थितीत एखादा आपत्कालीन रुग्ण दवाखान्यात नेण्याची वेळ आल्यास नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो.
महेश गायकवाड यांच्या घरापासून चरण गायकवाड यांच्या घरापर्यंतचा रस्ता देखील भाजी विक्रेत्यांनी व्यापलेला असल्याने या मार्गावरूनही हालचाल करणे कठीण झाले आहे. शहरातील वाहतूक कोंडी आणि अनियोजनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष नेमकी कोणती उपाययोजना करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात आठवडी बाजाराची योग्य नियोजनबद्ध व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, बाजारात पावतीच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याचीही चर्चा आहे. दहा रुपयांची पावती तीस रुपयांना दिली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. बाजारात नेमके किती विक्रेते बसतात, याची माहितीही नगरपालिकेकडे नाही का, व किती लोकांच्या पावत्या फाडून किती पैसे गोळा होतात याचा निकष नगरपालिकेकडे आहे का आसा सवाल उपस्थित केला जात आहे.
सध्याची नगरपालिकेची परिस्थिती ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ या म्हणीप्रमाणे असल्याची टीका नागरिक करत आहेत. केवळ ऑनलाईन मीटिंग घेऊन प्रशासन चालत नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत वाईकर व्यक्त करत आहेत.
शहरात १०० दिवसांच्या विकास आराखड्याचे उद्दिष्ट अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत असून, राजकारणातील फोडाफोडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उपनगराध्यक्ष पदावरील राजकीय घडामोडींमुळे शहराचा विकास झाला का, असा सवालही उपस्थित होत आहे. नव्याने निवडलेल्या विरोधी पक्षनेत्याने या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, भाजी विक्रेत्यांचे अधिकृत नोंदणीकरण झाले आहे का, त्यांना जागा कोणत्या निकषांवर कायम देण्यात आली आहे, याचीही चौकशी नगरपालिकेने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाई शहरातील वाढत्या समस्यांवर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




