वाई पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा गुलाल - विक्रांत डोंगरे सभापती तर वर्षा जगताप उपसभापतीपदी विराजमान

भाजपने प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने निवड एकतर्फी

panchayat samiti election, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

तालुक्याचे संपूर्ण राजकीय लक्ष लागून राहिलेल्या वाई पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत अखेर अपेक्षेप्रमाणे ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) बाजी मारली आहे. सभापती पदी पै. विक्रांत (भैय्या) डोंगरे तर उपसभापती पदी सौ. वर्षा जगताप यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या या विजयामुळे तालुक्यात पक्षाचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, भाजपने प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने ही निवड एकतर्फी झाली. 

सोमवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या 'देशभक्त किसनवीर' सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. राष्ट्रवादीकडे ८ पैकी ५ जागांचे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचे पारडे जड होते. मात्र, भाजप सदस्य स्वप्नील गायकवाड आणि सुरभी भोसले यांनी सुरुवातीलाच 'गुप्त मतदान' पद्धतीची मागणी लावून धरली. ही मागणी नियमात बसत नसल्याचे सांगत प्रशासनाने ती फेटाळून लावली. यामुळे संतप्त झालेल्या भाजप सदस्यांनी निवडीवर बहिष्कार टाकत सभागृहातून काढता पाय घेतला.

निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर भाजप सदस्या सुरभी भोसले यांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक विधान केले. त्या म्हणाल्या, "जर प्रशासनाने गुप्त मतदान पद्धत स्वीकारली असती, तर वाईत 'ऑपरेशन लोटस' नक्कीच यशस्वी झाले असते. राष्ट्रवादीचे काही सदस्य आमच्या संपर्कात होते, आता निकाल काय लागला असता हे तुम्हीच समजून घ्या." त्यांच्या या विधानामुळे वाईच्या राजकीय वर्तुळात 'सस्पेन्स' निर्माण झाला असून भविष्यात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत.

निवडीची अधिकृत घोषणा होताच पंचायत समिती परिसराबाहेर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना ना. मकरंद पाटील म्हणाले, "आज जिल्ह्यातील ५ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील. या यशाची पुनरावृत्ती आगामी २० तारखेच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही दिसेल."

निवडणूक प्रक्रियेनंतर नूतन सभापती पै. विक्रांत डोंगरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला दिले. डोंगरे म्हणाले की, "हे पद नसून सामान्यांची सेवा करण्याची मोठी जबाबदारी आहे. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

पै. विक्रांत डोंगरे यांच्या रूपाने पंचायत समितीला एक अभ्यासू आणि तरुण चेहरा मिळाला आहे. नूतन सभापती पै. विक्रांत डोंगरे यांनी आपल्या निवडीचे श्रेय नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला दिले. "हे पद नसून सामान्यांची सेवा करण्याची मोठी जबाबदारी आहे. तालुक्यातील रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या प्रलंबित प्रश्नांना आम्ही प्राधान्य देऊ," असे आश्वासन त्यांनी दिले.

वर्षा जगताप यांच्या निवडीमुळे महिला वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. या निवडीनंतर जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भविष्यातील कामांचा 'अजेंडा' मांडला. 

निवडीनंतर बोलताना वर्षा जगताप म्हणाल्या की, "कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला ही संधी मिळाली, हे केवळ ना. मकरंद पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री) यांच्या विश्वासामुळे शक्य झाले आहे. मी त्यांचे आणि माझ्या गणातील व तालुक्यातील सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते." 

उपसभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्यात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, झेडपी शाळांची गुणवत्ता वाढवणे आणि पटसंख्या वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळवणे आणि खेळाडूंना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे. तसेच "अभ्यास आणि खेळ यांची सांगड घातल्यास शाळांची पटसंख्या नक्कीच वाढेल, असा विश्वास असल्याचे वर्षा जगताप, उपसभापती, वाई यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !